@maharashtracity

मुंबई: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली आहे. त्यात अजून बदल झालेला नाही, असे स्पष्ट करत महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुंबई विकासासाठी एकत्र येण्याच्या आवाहनाला स्पष्ट शब्दात नकार दिला.

मुंबई महापालिकेची (BMC poll) निवडणूक तोंडावर आलेली असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी, मुंबईच्या विकासासाठी आपण एकत्रित येऊन काम करायला पाहिजे, असे आवाहन शनिवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसला केले. मात्र पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा (Opposition leader Ravi Raja) यांनी, मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी निवड झाली त्याच वेळी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. या भूमिकेत अद्यापही नवीन बदल झालेला नाही, असे सांगत महापौरांचे आवाहनाला अप्रतिसाद दर्शवला आहे.

त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) व मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी, पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत दिलेला नारा अद्यापही कायम आहे. तर शिवसेनेचा काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत हिरमोड झाला आहे.

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रयत्नाने विशेष निधीतून ‘एफ/ उत्तर’ विभाग, सायन कोळीवाडा, प्रभाग क्रमांक १७६ मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या हस्ते शनिवारी मोफत संगणक आणि टॅब वाटप करण्यात आले. त्यावेळी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी, आपल्या भाषणातून मुंबईच्या विकास कामांच्या निमित्ताने शिवसेना (Shiv Sena) व काँग्रेसने (Congress) एकत्रितपणे येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत साद घातली.

सध्या राज्यात, मुंबईत भाजपकडून कोणत्याही विषयावर विरोधाची भूमिका घेतली जात आहे, असे सांगत महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासारखे नेते हे मुंबईच्या विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाला साथ देत आहेत. तसेच ज्या ठिकाणी चुकीचे घडते तर ते थेट चुकीची बाब असल्याचे परखडपणे सांगतात. पालिका आयुक्तांकडे किंवा प्रशासनाकडे एखादा विषय मांडताना ते योग्य प्रकारे मांडतात. यामुळे मुंबईच्या विकासासाठी आपण एकत्र असले पाहिजे असे आवाहन महापौरांनी केले.

महापौरांच्या या आवाहनाबाबत पत्रकारांनी, पालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्याकडे विचारणा केली असता, भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले त्याच वेळी त्यांनी, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस मुंबईतील २२७ जागा स्वबळावर लढवणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यात अद्याप काही बदल झालेला नाही, असे सांगत रवी राजा यांनी महापौरांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here