प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

By अनंत नलावडे

नागपूर: अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना चोरीचे प्रकरण म्हणून तपास करण्याचे आदेश दिले असतील तर त्यांच्या फोन कॉलची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी आज विधानसभेत अहमदनगर जिल्ह्यातील धर्मांतराबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभागी होताना अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन हा तपास चोरीच्या दिशेने करण्यास सांगितले. खासदार नवनीत राणा आणि मी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करून राज्याचे मुख्यमंत्री प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. त्यावर शहा यांनी हा तपास एनआयएकडे तपास सोपवला होता. तेव्हा नुपूर शर्माच्या समर्थनार्थ हिंदुत्वाच्या बाजूने पोस्ट केल्याने भरचौकात कोल्हे यांची हत्या केल्याचं स्पष्ट झाले होते, असे राणा नमूद केले. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

त्यावर देसाई यांनी राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल आणि उद्धव ठाकरे यांच्या फोन कॉलची चौकशी केली जाईल, असे जाहीर केले.

राहुरीच्या पोलीस निरीक्षकाची चौकशी

दरम्यान, नगर जिल्ह्यातील धर्मांतराला संरक्षण देत असल्याचा आरोप असलेले राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची अतिरिक्त पोलीस अधिक्षकांमार्फत चौकशी करण्याची आणि आजच त्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात येत असल्याची घोषणाही  देसाई यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here