@maharashtracity

धुळे: इंधन दरवाढी विरोधात आमदार फारूक शाह (MLA Farooव Shah) यांनी आज बैलगाडीवर स्वार होत मोर्चा काढला. यावेळी त्यांनी महागाईला कारणीभूत ठरवत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.

एम आय एम चे (MIM) आमदार शाह म्हणाले, देशभरात पेट्रोल, डीझेल, गँस धान्य, डाळी आणि खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याऐवजी केंद्र सरकार कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर डीझेलचे दर ९२ रुपयांवर येऊन पोहचले आहेत. खादय तेलाने तर कधी नव्हे एवढे १५० रुपये किलोचे दर पार केले असून डाळीचा दरही १०० रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. घरगुती गँस सिलिंडरची किंमत ८५० रुपये झाली आहेच, पण त्यावरील सबसिडीही बंद केली आहे.

सद्य परिस्थितीत अन्न, वस्त्र, निवारा आणि इंधन प्रत्येकाला गरजेचे आहे. केंद्र शासनाचा पेट्रोलचा दर ३३ रुपये लिटर तर ३२ रुपये प्रति लिटर डिझेलचा दर आहे. राज्य सरकार व्हॅटच्या नावावर २५% प्रति लिटर पेट्रोल २२% डिझेल वर आकारीत आहे. परंतु पेट्रोल व डीझेलवर संपूर्ण भारतात सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांनी आपले टँक्स कमी करून सध्या आकारण्यात आलेल्या किमती मध्ये २५% घट म्हणजे कपात केली पाहिजे, अशी मागणी आमदार शाह यांनी केली.

दरवाढीवर केंद्रात असलेल्या भाजप आणि मोदी सरकारचे नियंत्रण राहिले नसून देशातील सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

आमदार फारूक शाह यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चेकर्यांनी धुळे जिल्हा एमआयएम पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. भाजप सरकारने लवकरात लवकर इंधन दरवाढ आणि डाळी आणि खायच्या तेलाची केलेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि देशाच्या जनतेला दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी संजय यादव यांना आमदार शाह यांनी दिले. दरवाढ मागे घेतली नाही तर धुळे जिल्हा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनाच्या वेळी आमदार फारूक शाह यांच्यासमवेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष युसुफ मुल्ला, शहराध्यक्ष नुरा शेख, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, नगरसेवक सईद बेग, युवक जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, शहराध्यक्ष शेहबाज शाह, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष नजहर खान, शहराध्यक्ष हमीद अन्सारी तसेच धुळे जिल्हा व शहर एमआयएम पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here