नवनीत राणा यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
@maharashtracity
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवेन तसेच मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार, अशी घोषणा खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी रविवारी केली.
नवनीत राणा लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) दाखल होत्या. रविवारी त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, प्रभू श्रीरामाचे नाव घेणे, हनुमान चालिसा म्हणणे गैर असल्याचे त्यांना वाटत असेल तर १४ दिवस काय… मी १४ वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे. त्यासाठी १४ वर्षे जरी जेलमध्ये टाकले तरी माझा आवाज दबणार नसल्याचेही नवनीत राणा यांनी उच्चार केला.
महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असून त्याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचेही राणा यांनी सांगितले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर गेल्या दिवसांपासून उपचार सुरु होते. त्या मणका तसेच मान दुखीने त्रस्त होत्या. राणा दांपत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत धडकले होते. यावेळी राणा दांपत्याला अटक करण्यात आली. १२ दिवस तुरुंगात काढल्यानंतर नवनीत राणा यांची गुरुवारी जामिनावर सुटका झाली होती. त्यामुळे गुरुवारीच नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या. डॉक्टरांनी देखील त्यांच्या सर्व तपासण्या करुनच घरी सोडण्यात येईल असे सांगितले होते.