@maharashtra.city

मुंबई: मुंबईतील बीकेसी मैदानावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती. परंतु या जनतेने शिंदेचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या (BJP) हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेल्या स्क्रिप्टचे वाचन केले, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी केला.

नाना पटोले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात काँग्रेस (Congress) पक्षावर टीका केली. वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांची गद्दारी हा त्यांचा व शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा अंतर्गत विषय आहे. परंतु, आपल्या बंडखोरीचे पाप झाकण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक मंत्री, आमदार वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत, ते आम्ही खपवून घेणार नाही.

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण आहे किंवा असावा याची चिंता एकनाथ शिंदे यांनी करु नये. एकनाथ शिंदे यांना स्वतःचा पक्ष कोणता आहे हे माहीत नाही. म्हणून त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना, अनुभवी तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा व देशाला जगात ताठ मानेने उभा करण्यात सिंहा वाटा असलेला पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांची कामगिरी काहीही नाही. भाजपाच्या इशाऱ्यावर काम करणे व दिल्लीच्या आदेशाची अंमलबजावणी करणे एवढेचे त्यांचे कर्तृत्व आहे, अशी ही टीका पटोले यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने २०१९ साली निवडून आणलेल्या आमदारांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) स्थापन केले होते. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवून राज्यातील जनतेच्या हितासाठी हे सरकार स्थापन केले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबरचे ४० आमदारही या सरकारमध्ये होते. काँग्रेसचा पाठिंबा एवढा नकोसा होता तर त्याचवेळी बाहेर पडण्याचे धाडस का केले नाही? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा वारसा सांगता, पण याच बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) व प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांना पाठिंबा दिला होता हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? त्यावेळीही विरोध करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी केले होते का? स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा व भाजपाच्या सल्ल्यावर मान डोलावणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला दोष देणे थांबवावे, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here