Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असून कापूस, धान, तूर, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis govt) शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारला आपण सभागृहात जाब विचारू आणि शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारला भाग पाडू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी सोमवारी विधानभवनात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.  

राज्यातील शेतकऱ्याची स्थिती भयावह असताना शिंदे-फडणवीस सरकार मात्र राज्यपालांच्या भाषणातून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. सरकारने हमी भावाप्रमाणे कांद्याची खरेदी केली पाहिजे. मका, हरभरा, तूर कापूस, सोयाबीन, धानसुद्धा कमी दराने खरेदी केला गेला. आता शेतकऱ्यांकडचे धान संपल्यानंतर खासगी व्यापाऱ्यांनी धानाची किंमत दुप्पट केली. अशीच परिस्थिती इतर शेतमालाचीही आहे. शेतमाला भाव नाही आणि शेतीला लागणारे साहित्य, वीज महाग झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. पण शिंदे फडणवीस सरकार मात्र झोपलेले आहे. राज्यातील ईडी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, अशीही टीका पटोले यांनी केली.

२०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार (BJP Government) आल्यापासूनच देशात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे. देशात सध्या अघोषीत आणीबाणी असून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात आहे. लोकांमध्ये भाजपच्या विरोधात तीव्र संताप आहे. या संतापाचा उद्रेक झाल्याचे आपल्याला लवकरच दिसेल, असेही पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here