Twitter: @maharashtracity

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार ज्या महाशक्तीच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल असे सांगत होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे या देशातील स्वायत्त संस्था कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह तुम्ही चोरू शकता पण त्यांना असणारा जनतेचा आशिर्वाद कसा काढून घेणार असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी विचारला आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिवसेनेतील फुटी संदर्भातील प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. ती अद्याप पूर्ण व्हायची असून त्याचा निकाल येण्याआधीच निवडणूक आयोगाने (Election Commission of India) नाव आणि चिन्हाबाबतचा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतला आहे? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. पण त्यांच्या कार्यपद्धतीत ते कुठेही दिसत नाही. या संपूर्ण प्रकरणात आयोगाची (ECI) कार्यपद्धती एकतर्फी आणि संशयास्पद राहिली आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले, शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Supremo Balasaheb Thackeray) यांच्या बोटाला धरून महाराष्ट्रात वाढलेल्या भाजपने (BJP) आज त्यांचा पक्ष संपवण्याचा कृतघ्नपणा केला आहे. महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्याने पहात आहे. भाजप केंद्रीय संस्थाचा वापर करून ठाकरेंचा पक्ष हिसकावून घेऊ शकते पण जनतेचा ठाकरेंना असणारा आशिर्वाद कसा हिसकावून घेणार? महाराष्ट्रातील जनता गद्दारांना माफ करणार नाही. शेवटी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच विजय होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here