मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती
मुंबई: राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीपासून नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. तसेच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांसारख्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यावेळी दिले. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे १०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले असून संबंधित प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. त्याचवेळी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पोषण आहाराचा दर लवकरच वाढविण्यात येईल. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ऍप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.