सामान्य प्रशासन विभागाचे आदेश
By मिलिंद माने
Twitter: @milindmane70
मुंबई: राज्यातील मंत्री व आमदार आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांबाबत जनतेला प्रभावित करण्यासाठी अधिवेशन काळात वेगवेगळ्या विभागाच्या बैठका घेण्याचा सपाटा लावतात. मात्र, यंदाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन (Nagpur winter session) या गोष्टीला अपवाद ठरणार आहे.
अधिवेशन काळात अधिवेशनासंबंधित नसलेल्या बैठका न घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व सचिव व मंत्रालयीन विभागाला दिले आहेत.
राज्यातील मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांप्रमाणेच आमदार देखील अधिवेशन काळात विकास कामासंदर्भात वेगवेगळ्या खात्यांच्या बैठका आयोजित करून मतदारसंघातील जनतेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही किती जागृत आहोत, असे भासवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण पडत असल्याने या बैठकांवर चालू हिवाळी अधिवेशनात सामान्य प्रशासन विभागाने निर्बंध आणले आहेत.
केवळ याच बैठका अनिवार्य
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान मंडळात उपस्थित झालेल्या अथवा उपस्थित होण्याची शक्यता असणाऱ्या तसेच स्थानिक प्रश्नांसंबंधीच्या बैठका वगळता अधिवेशनाची संबंधित नसलेल्या बैठका नागपूर अधिवेशनाच्या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार नाहीत. याची दक्षता सर्व विभागाच्या सचिवांनी घेण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव राजश्री हिर्लेकर यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.