कामकाजाला आलेल्या आ. सरोज अहिरे बाळाच्या काळजीने चिंताग्रस्त

Twitter : @maharashtracity

मुंबई: हिरकणी कक्ष कसा असावा, कक्षाची रचना कशी असावी, कक्षात काय असावे याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांच्या परिपत्रकाला हरताळ फासत विधीमंडळातील हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असून अधिवेशनासाठी प्रत्येक आमदार विधी मंडळात दाखल झाले आहेत. त्याप्रमाणे नाशिक देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे त्यांच्या लहान बाळाला घेऊन आल्या. मात्र बाळासाठी आवश्यक असलेल्या विधीमंडळातील हिरकणी कक्षाची स्थिती पाहून त्या काळजीत पडल्या.

हिरकणी कक्षावर बोलताना आमदार सरोज अहिरे म्हणाल्या की, “आठवडाभरापूर्वी याबाबत निवेदन दिले होते. मी विधीमंडळाच्या कामकाजाला बाळाला घेऊन आल्याने प्रथम हिरकणी कक्ष जाऊन पाहिला. तर या कक्षाबाहेर केवळ हिरकणी कक्ष अशी पाटी आढळली. एरव्ही तो विभाग कशासाठी वापरला जात होता याची कल्पना नाही. विभाग दुरावस्थेत आहे. अशा ठिकाणी आजारी बाळाला घेऊन जाणेच धोक्याचे वाटते”, असे सरोज अहिरे यांनी  सांगितले. सोमवारपासून पुढील बावीस दिवस अधिवेशनातील कामकाज कसे करणार असा सवाल सरोज यांना पडला आहे. त्यांनी पाहिलेल्या हिरकणी कक्षात धूळ होती. तर इतर सोयी सुविधांचा वाणवा होता, असे त्या  म्हणाल्या. 

राज्याच्या विधीमंडळ सदस्यांच्या हिरकणी कक्षाच्या मागणीकडे जर दुर्लक्ष होत असेल तर सर्वसामान्य मातांच्या हिरकणी कक्षांची अवस्था काय असू शकते, असा प्रश्न या प्रसंगातून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व कार्यालयांत महिलांसाठी हिरकणी कक्षा विभागाची व्यवस्था करावी अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली आहे. यापूर्वी नुकत्याच झालेल्या नागपूर येथील अधिवेशनात आमदार सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन आल्या होत्या. तेव्हा त्या ठिकाणी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.

राज्यात सुमारे ६८ टक्के महिलांना कार, बसस्थानक, शौचालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करावे लागते. दहा वर्षांपूर्वी घेतलेल्या हिरकणी कक्ष उभारण्याच्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याची खंत राज्याच्या हिवाळी अधिवेशनात श्रीकांत भारतीयांनी केली व्यक्त केली होती. माता महिलांसाठी राज्यभरात तत्काळ हिरकणी कक्ष उभारावे, अशी सूचना सभापतींनी राज्य सरकारला द्यावी, अशी मागणी यावेळी भारतीया यांनी केली होती.  

हिरकणी कक्षाची योजना

स्तनदा मातांकडून बाळांना स्तनपान करण्यासाठी भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाने हिरकणी कक्ष ही संकल्पना पुढे आणली. त्यानंतर सरकारने आरोग्य विभागाच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने परिपत्रक काढले. परिपत्रकात हिरकणी कक्ष कसे असावे यावर स्पष्टता आणली आहे. हिरकणी कक्ष उपलब्ध झाल्यास माता बाटलीत दूध साठवून घरी गेल्यावर बाळाला पाजू शकतात. हिरकणी कक्षाची सुविधा सर्वत्र सहज उपलब्ध झाल्यास मातांना तसेच बाळांच्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here