राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांची ग्वाही
@maharashtracity
धुळे: आदिवासी शेतकरी, महिला कष्ट करुन शेतीमाल पिकवितात. वेगवेगळी पीकं घेतात. परंतू, त्याच्या शेतमालाची मार्केटींग होत नसल्याने त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. आदिवासी शेतकरी, महिलांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केटींग आणि योग्य पॅकीजिंग झाले पाहीजे. शिवाय, शेतीच्या प्रश्नांवर अधिक लक्ष दिल्यास शेत मजूरांच्या स्थलांतराचाही प्रश्नही निकाली निघेल. या सर्वांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग (Food Processing Unit) उभारुन शेतीमालाला चांगला भाव कसा मिळेल. यासाठी मी स्वतः पुढाकार घेईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.डॉ.सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केले.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे येथील एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयाच्या सभागृहात खान्देशस्तरीय विचार संवाद कार्यक्रम झाला. यावेळी खा.सुप्रिया सुळेंच्या हस्ते नागरांची पुजा करुन आणि रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, नाजनिन शेख, नंदा मावळे, सुवर्णा पाटील, उषा पाटील, डॉ.विजया अहिरराव हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
नंदुरबार (Nandurbar) व जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सातपुडा आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य, शेती व वनसंवर्धनाच्या बाबतीत जे काही प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. हे प्रश्न सोडविण्यासाठी केेंद्र स्तरावरही पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही सुळे यांनी दिली. तसेच लोकसंघर्ष मोर्चाने जे काम केले आहे, त्या माध्यमातून कामाची उर्जा आमच्यापर्यंत पोहचते, असेही त्या म्हणाल्या.
धुळे जिल्हा रुग्णालयातील (Civil Hospital) समस्या सोडविण्यासाठी ना. टोपेंकडे (Rajesh Tope) मिटींग लावू, साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रातील मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी या प्रकरणावर मी बोलेल, आमच्यात वैचारीक मतभेद असले तरी आम्ही तुमचे प्रश्न त्यांच्याकडे नक्कीच मांडू. त्यावर उपाययोजना केल्या जातील. लोकसंघर्ष मोर्चा आयोजीत या परिषदेचे प्रास्ताविक प्रतिभा शिंदे यांनी केले.