#राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांचा इशारा

By अनंत नलावडे

Twitter: @NalavadeAnant

मुंबई: महाराष्ट्र कर्नाटक वाद अजूनही थांबायला तयार नाही. तशात संसदेत महाराष्ट्रातील खासदारांना या विषयावर बोलू दिले जात नाहीये. माईक बंद केला जात आहे. ही महाराष्ट्राची मुस्कटदाबी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

मुंबई शहराचा विचार केला तर याठिकाणी अनेक गुजराती, बंगाली, उर्दू, तसेच इतर भाषिक शाळा आहेत. कधीही याठिकाणी मराठी सक्ती आहे असे म्हटले नाही. मातृभाषा हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. तो महाराष्ट्राने व देशाने मान्य केला. तेच सूत्र कर्नाटकने मान्य करावे तर तेही होत नाही. यातून संघर्ष झाला तर त्यामध्ये सत्तेचा गैरवापर करून त्या चळवळीला किंवा विचाराला मोडून काढण्याचे काम कोणी केले तर त्याची प्रतिक्रिया निश्चित उठते. दुर्दैवाने यात केंद्र सरकारने लक्ष दिलेले नाही. दोन राज्याच्या प्रश्नावर संसदेत नाही बोलायचं तर कुठे बोलायचे? जर यात तुम्ही लक्ष घालणार नसाल अणि कोणी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी कोणाची? म्हणून महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद प्रश्र्नी केंद्र सरकारला बघ्याची भुमिका घेता येणार नाही, असे स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केंद्र सरकारला गुरुवारी पक्षाच्या एका कार्यक्रमात खडे बोल सुनावले.

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमाप्रश्न उपस्थित केला. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी हे दोन राज्यांचे भांडण आहे त्यावर इथे बोलण्याचा संबंध नाही. दोन राज्याच्या प्रश्नावर संसदेत नाही बोलायचं तर कुठे बोलायचे? जर यात तुम्ही लक्ष घालणार नसाल तर कोणी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी कोणाची? म्हणून केंद्रसरकारला बघ्याची भुमिका घेता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारला सुनावले.

पवार म्हणाले, सीमाप्रश्न हा फार जुना प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या मागणीला जनतेचा आधार आहे. आपण अनेक निवडणुकीमध्ये हा निर्णय लोकांचा आहे हे देशासमोर सिद्ध करू शकलो. अनेकदा याठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागल्यानंतरही काही होत नाही हे पाहिल्यानंतर लोक नाउमेद होतात. अशीच परिस्थिती सध्या सीमाभागात झाली आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांनी बेळगाव किंवा अन्य भागातील प्रश्न संपुष्टात कसा निघेल, इथले मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजनाबद्ध प्रयत्न केले, असा आरोपही पवार यांनी कर्नाटक सरकारवर केला.

कर्नाटकात मागील दोन दिवसापूर्वी निर्माण झालेली परिस्थिती आता थंड झाली आहे. या चळवळीत उतरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुक यंत्रणेवर हल्ले झाले. हे हल्ले थांबविण्यासाठी त्या सरकारची जबाबदारी असताना ती जबाबदारी त्यांनी नीट पाळली नाही. त्यासाठी काही सांगण्याची आवश्यता होती, म्हणूनच ती भूमिका घेतली, असे सांगतानाच पवार म्हणाले मला आनंद आहे की, आज सकाळी सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकाऱ्यांशी बोललो. तेव्हा कळालं की त्याठिकाणी तणावाचे वातावरण नाही. त्यामुळे हे सर्व दुरुस्त होत असेल तर महाराष्ट्र कधीही कटुता वाढेल असे काम करणार नाही अशी ग्वाहीही पवार यांनी दिली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की, कुठेही कटुता होणार नाही, सत्तेचा गैरवापर होणार नाही, वाहनांवर हल्ला होणार नाही ही चांगली गोष्ट आहे. परंतू शेवटी ते म्हणाले की, आमची मागणी आम्ही सोडणार नाही. यात पुन्हा ते सोलापूर, अक्कलकोट या गोष्टी आल्याच. जर संयमाने जाण्याची भूमिका व अन्य भाषिकांच्या हिताची जपणूक करण्याची निती ही त्यांची कायम असेल तर आपल्याकडून आगळीक कधी होऊ दिली जाणार नाही ही काळजी महाराष्ट्रातून आपण घेऊ असे आश्वासनही पवार यांनी दिले.

कर्नाटकने जाणूनबुजून अनेक सरकारी कार्यालय या ठिकाणी आणली. कानडी लोकसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. मराठी आणि कानडी यांच्यात वाद नाही. कानडीचा द्वेष आम्ही कधी करणार नाही. कानडीसुद्धा एका राज्याची भाषा आहे. आपला त्या राज्याशी संघर्ष नाही. आपला संघर्ष फक्त तिथे असलेल्या मराठी भाषिकांना न्याय मिळावा, त्यांना न्याय मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे, जो लोकशाहीच्या माध्यमातून अनेकदा सिद्ध झाला, तेवढ्यापूरता हा प्रश्न आहे. पण दुर्दैवाने तिथल्या सरकारने वेगळी भूमिका घेतली, अशी टीका पवार यांनी केली.

ते पुढे म्हणाले, राज्याचे अधिवेशन त्या भागात घेता येईल यासाठी कर्नाटक सरकारने तिथे विधान भवन बांधले. येणारे अधिवेशन हे बंगळूरला न होता बेळगावला होणार आहे. यातून त्या भागाचा महाराष्ट्राशी अथवा मराठी भाषिकांशी काही संबंध नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी न शिकता कानडी शिकावे हा आग्रह आहे. त्यामुळे लोक अस्वस्थ आहेत, असेही पवार यांनी यावेळी येथे नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here