भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: मुख्यमंत्र्यानी विधानसभेत शिवसेना पक्षाचा ताबा घेतल्यानंतर आता विधान परिषद सभागृहातील पक्ष संघटनेकडे मोर्चा वळविला आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषदेत १३ आमदार आहेत. त्यांच्यात २/३ सदस्य मुख्यमंत्री शिंदे गटाकडे गेल्यास परीषदेत फूट पडण्याची रणनीती आंखली जात आहे.

शिवसेना (शिंदे) गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले की, विधानपरिषद आणि विधानसभा दोन्हीकडे आमचे ऑपेरेशन सुरु आहे. त्यात आम्हाला पूर्ण यश मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जे काम करतात ते १०० टक्के यशस्वीच करतात. त्यामुळे आता विधानसभेनंतर विधानपरिषदेत आपले संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदे गटाने ऑपेरेशन सुरु केले आहे, हे स्पष्ट झाले आहे.

राज्य विधानसभेत संख्याबळ वाढवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विधान परिषदेकडे (Vidhan Parishad) लक्ष केंद्रित केले आहे. विधान परिषदेचे सदस्य विप्लव बजोरिया यांना प्रतोद करावे, असे पत्र सभापतींना देण्यात आल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली. सत्तांतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) न्याय प्रविष्ट असताना शिंदे सेनेकडून शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्यात आले. 

गोगावले म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मात्र तिथे  निर्णय आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही बजावलेले व्हीप केवळ कामकाजाला हजेरी लावणे आणि उपस्थिती दाखवणे यासाठी आहे. दोन आठवडे कोणावर कारवाई केली जाणार नाही. मात्र, नंतर आम्ही पुन्हा व्हिप बजावू. हा व्हिप मात्र बंधनकारक असेल, असेही गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधानसभेत शिंदे सेनेचे संख्याबळ आहे. आता विधान परिषदेत ते वाढवण्याचा प्रयत्न आहे. ही सुरुवात आहे, लवकरच आणखी गोष्टी कळतील असेही गोगावले यांनी सांगितले. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे आमचे नियम सर्वांना लागू असतील, असेही गोगावले यांनी यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here