By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सभागृहात आक्रमक झाले आणि वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली.

खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना दादा भुसे यांनी संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवाराच्या घरची चाकरी करतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निदर्शनास आणून दिले की दादा भुसे यांना शरद पवार यांचे नाव घेण्याची आवश्यकता नव्हती. भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.

दादा भुसे यांनी केलेले वक्तव्य माध्यमांपर्यत गेले आहे, त्यामुळे तुम्ही रुलिंग लवकर द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.

दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर ते रेकॉर्डवरुन काढण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here