@maharashtracity

ओबीसी प्रश्नी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची आघाडी सरकारवर टीका

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेच (MVA government) इतर मागास वर्गाचे राजकीय आरक्षण घालवले आणि या समाजाची फसवणुक केली, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी केला आहे.

ओबीसींची (Other Backward Class) कशी फसवणूक केली याचे स्पष्टीकरण देतांना आमदार पडळकर म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी (Political reservation to OBC) अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला 450 कोटी रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती.

ही घोषणा करून पवार आणि ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्वतःच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळवली. प्रत्यक्षात देण्याची वेळ आली तेव्हा फक्त साडेचार कोटी रुपये दिले, असे पडळकर म्हणाले.

भाजप आमदार पूढे म्हणाले, की आघाडी सरकारने रु 4.5 कोटी तर दिले. पण ते खर्च करण्याचे आदेशच अजूनपर्यंत आयोगाला (State Backward Class Commission) मिळालेले नाहीत.

“या आयोगाला पूर्णवेळ सचिव नाही, कामकाज चालवायला कार्यालय नाही, आयोग पुण्यात तर संशोधक सोलापूरात बसतात अशी या आयोगाची अवस्था आहे,” अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारचे वाभाडे काढले.

“वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केलीये. ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंछी करतात,” असा आरोप पडळकर यांनी केला.

ते म्हणाले, “आता तर हद्दच झाली. १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होती. त्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने (Thackeray Government) आयोगाकडून अंतरिम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही झाले तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार असे जाहीर केले.”

याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणूकात ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही आणि अन्य समाजाचे प्रस्थापित नेते हे ओबीसींच्या राजकीय हक्कावर डल्ला मारणार, असा आरोप पडळकर यांनी केला.

पडळकर यांनी समस्त ओबीसी बांधवांना आवाहन केले की ओबीसींच्या नावावर लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here