@maharashtracity

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार (BJP govt) येऊ देणार नाही असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी तीव्र टीका केली आहे. पवारांना पक्ष स्थापनेपासून कधी स्वतःचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, त्यांनी भाजपला थोपवण्याची भाषा करणे योग्य नाही, असे पडळकर म्हणाले.

पुण्यात मेट्रो रेल्वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. यानंतर पवार यांनी मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली होती.

याचा संदर्भ घेऊन भाजप नेते पडळकर म्हणाले, “शरदचंद्र पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात.”

“त्यांना पुणे मेट्रोच्या (Pune Metro) कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे सन्माननीय पवार साहेब हताशपणे बोलले असतील,” अशा शब्दात पडळकर यांनी पवारांवर टीका केली.

“आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पवारांचा राग यामुळेच आहे की माझ्यासारखा धनगराचा (Dhangar) पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ (Sadabhau Khot) असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते (Ram Satpute) असो, यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले,” असे उदाहरण देऊन पडळकर म्हणाले, त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडणवीस त्यांच्या नजरेत खुपतात.

“मी पवार यांना सांगू इच्छीतो की फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ असे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा सत्तेत आणण्याकरताच निवडून दिले होते,” याची आठवण गोपीचंद पडळकर यांनी करून दिली.

पवारांच्या नेतृत्वात पावसात भिजूनसुद्घा फक्त ५४ च आमदार निवडूण आले, असा खोचक टोला लागवून पडळकर म्हणाले, पवार साहेब, जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारू नका.

“आपण म्हणता मी भाजपला पुन्हा येऊ देणार नाही. पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या 21 वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणे सोपं असते, पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असते, याची आठवण पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांना करून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here