#समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By Anant Nalavade
Twitter: @NalavadeAnant
मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान, गुरूवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Corridor) लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे.
राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार असून विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada) भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असे सांगत शिंदे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत असून आपल्या राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मुख्य सचिवांनी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होईल. त्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज १ चे उद्घाटन, वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, मिहान एम्सचे लोकार्पण, त्यानंतर वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा मेट्रो प्रवास देखील पंतप्रधान करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री सर्वश्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav), हरदीप पुरी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
समृद्धी महामार्गाविषयी
#नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्वाचा प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आला आहे.
#या महामार्गास दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” असे नाव देण्यात आले आहे.
#पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे.
#सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८८६१.०२ हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.
#हा प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
#प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण ८४ बांधकामे प्रस्तावित होती. तथापि गरजेनुसार ही बांधकामे १०० पर्यंत वाढविण्यात आली आहेत. त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.
#सद्यस्थितीत १ ते ११ (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.
#पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीचा रस्ता. वाहतुकीसाठी तयार आहे. त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.