औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरविणार, कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती

मुंबई: कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्य शासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांनीही सहभागी व्हावे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनीधीं समवेत बैठक घेतली. कंपन्यांच्या ‘बैठका व्हर्चुअली’ घेतानाच ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती अवलंबण्याचे कंपन्यांनी मान्य केले. त्यांच्या माध्यमातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेंन्टीलेटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव यांच्यासह औषधे, बँका, संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक तेवढा प्रवास करावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

खासगी कंपन्यांमार्फत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम संकल्पनेनुसार परावनगी देण्यात आली असून नियमीत होणाऱ्या बैठकांना कर्माचाऱ्यांना न बोलावता व्हर्च्युअली बैठका घेण्यात येत असल्याचे मनुष्यबळ व्यवस्थापकांनी सांगितले.
कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मास्क, सॅनेटाझर्स, पीपीई कीट, व्हेंटीलेटर्स, शासनासाठी उपलब्ध करून देण्याची यावेळी मान्य केले. रुग्णांच्या आयसोलेशनसाठी सुविधा देखील उपलब्ध करून देण्याबाबत या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तयारी दर्शविली. जी औषधे अत्यावश्यक आहेत, ती देखील औषध कंपन्यांकडून मोफत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याचे, आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सेवा, आस्थापना, कार्यालये बंद करण्याबाबत शिफारस यावेळी या कंपन्यांनी केल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले. कोरोनाच्या जाणीव जागृतीसाठी खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली असून, सीएसआरच्या माध्यमातून विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. ज्यांचा रोजदांरीवर उदरनिर्वाह आहे, त्यांच्यासाठी काही विशेष सोय करण्याबाबतही याबैठकीत चर्चा झाली.

कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी करण्याबाबत केंद्राकडून परवानगी घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस लूपीनचे यश महाडीक, सोनी पिक्चर्सचे मनू वाधवा, एचएसबीसी बँकेचे विक्रम टंडन, सिप्लाचे राजीव मेस्त्री, एल ॲण्ड टीचे डॅा. के. जे. कामत, अक्सेच्यंर्सचे आदित्य प्रियदर्शन, एसएचआरएमचे अंचल खन्ना, ग्लॅक्सो-स्मिथक्लाईनचे मिनाक्षी प्रियम, डॅाएच्च बँकेचे माधवी लल्ल, आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रिती चोप्रा, जॅान्सन ॲण्ड जॅान्सनचे सार्थक रानडे आणि राकेश साहनी, आयसीआयसीआय बँकेचे सौरभ सिंह, सिटी बँकेचे बी. सेंथिल नाथन, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सीमा नायर, ले-नेस्टचे डॅा. मुकेश गुप्ता आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here