By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
मुंबई: प्रा.जोगेन्द्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे गटाने आज अधिकृतरित्या हातमिळवणी केली. मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा कवाडे (Prof Jogendra Kawade) यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही युती झाल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाची (People’s Republican Party – PRP) युती झाल्याची घोषणा आज या दोन्ही नेत्यांनी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
यासंदर्भात प्रा. कवाडे म्हणाले, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित झालेल्या आपल्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या पक्षासोबत युती करावी, असा आग्रह धरला होता. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकांमध्येदेखील हाच सूर उमटत होता. त्यामुळे ही युती आकाराला येत आहे.
या युतीच्या जाहीर सभा महाराष्ट्रातील पाच महसुली विभागात घेण्यात येतील, अशी घोषणाही प्रा. कवाडे यांनी यावेळी केली. युतीमध्ये जेवढ्या जागा आमच्या पक्षाच्या वाट्याला येतील त्या लढवू अशी माहितीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, प्रा कवाडे हे आक्रमक व अभ्यासू नेते आहेत. चळवळीसाठी त्यांनीही संघर्ष करून कारावास भोगला आहे. आम्हीदेखील शिवसेनाप्रमुखांचा विचार आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या शिकवणीप्रमाणे संघर्ष करीत लाठया-काठ्या खाल्ल्या आहेत. प्रा कवाडे यांनी ऐतिहासिक लाँग मार्च काढला होता. त्यांचा हा लॉंग मार्च आता योग्य ठिकाणी येऊन थांबला आहे असेही एकनाथ शिंदेही म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi -VBA) उद्धव ठाकरे गटासोबत युती होत असल्यामुळे तुमची ही युती होत आहे काय? असा प्रश्न पत्रकारांनी केला. तेव्हा शिंदे म्हणाले, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे देखील माझे चांगले मित्र आहेत. राजगृह येथे आमची भेट झाली, चर्चा देखील झाली. परंतु ती चर्चा राजकीय नव्हती. प्रा. कवाडे यांच्यासोबत आमची फार पूर्वीपासून चर्चा सुरु होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.