मागाठाण्यात प्रकाश सुर्वेंचे जोरदार स्वागत

@maharashtracity

मुंबई: होय, मी भाजी विकायचो. भाजी विकणं गुन्हा आहे का ? कष्ट करणे गुन्हा नाही. माझ्या आईवडिलांनी कष्टाने- मेहनतीने भाजीचा व्यवसाय केलाय. ज्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि याच कष्टकरी जनतेने मला निवडून दिलेय. म्हणून मी कष्टकऱ्यांचा, गोरगरीबांचा आमदार आहे आणि पुढेही असेन, अशा शब्दांत मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात झालेल्या स्वागत सभेत भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्रात गेले दोन आठवडे सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आपल्या विधानसभा क्षेत्रात परतलेल्या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या स्वागतासाठी कष्टकरी जनतेने, नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी गर्दी करून अनोखे शक्तिप्रदर्शन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून दहिसर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयादरम्यान निघालेल्या स्वागत यात्रेने सारा परिसर भगवामय झाला होता. या उत्साहपूर्ण यात्रेत त्यांना साथ देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के आवर्जून उपस्थित होते.

आज मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या स्वागतासाठी हजारो संख्येने झालेली गर्दी बोलकी होती आणि शिवसेनेच्या गोटात धडकी भरवणारी होती. विशेष म्हणजे या गर्दीतून आवाज कुणाचा… शिवसेनेचाच ! असा जयघोष घुमत होता. गुलाल उधळत, फुलांचा वर्षाव करीत सुर्वे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

विभागातील नागरिकांचे, कष्टकऱ्यांचे आणि सैनिकांचे अभूतपूर्व प्रेम पाहून सुर्वेच नव्हे तर खासदार शिंदे आणि नरेश म्हस्केही अक्षरशः भारावले. सुर्वेंनी आपल्या भाषणात आपल्यावर भाजीवाला म्हणून केलेल्या टीकेचा समाचार घेतला. धंदा कोणताही असो, तो करणं म्हणजे गुन्हा नव्हे. मी भाजीवाल्याचा मुलगा आहे. मी भाजीवाला आहे. याच भाजीवाल्यांनी, रिक्षावाल्यांनी, चहावाल्यांनी, गोरगरीबांना मला निवडून दिलेय. त्यांनी आज माझ्यावर जे प्रेम दाखवलेय, त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी असेन. तसेच मी उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांचा ऋणी आहे. त्यांनी मला संधी दिल्यामुळेच मी सेनेचा आमदार होऊ शकलो, अशा शब्दात सुर्वे यांनी त्यांचे मनापासून आभारही मानले.

सुर्वे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या स्वागतासाठी उतरलेल्या जनसागराला पाहून खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, बंड पुकारलेल्या आमदारांचे मुंबईत कसे स्वागत होईल ते बघा? असे सांगणाऱ्या प्रवक्त्याने मागाठाण्याच्या रस्त्यावर उतरलेले वादळ पाहून घ्यावे. गेली अडीच वर्षे लोकांची कामं होत नव्हती. आपल्या आमदारांना वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे अशा सरकारबरोबर राहण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी उठाव केला आणि हिंदुत्ववादी सरकार स्थापल्याचे शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here