@maharashtracity

मनसेचा शिवसेनेवर आरोप

मुंबई: मुंबई महापालिकेच्या २१०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कंत्राटकामात काळ्या यादीतील ६ कंत्राटदारांचा समावेश करण्यात आला आहे.

कंपन्यांना कामं मिळावं म्हणून प्रशासन आणि शिवसेना षडयंत्र रचत आहेत. याद्वारे शिवसेना निवडणूक फंड गोळा करण्याचे काम करत आहे, असे गंभीर आरोप मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी केले आहेत. (MNS blames Shiv Sena is collecting election fund from blacklisted contractors)

विरप्पन जसा जंगलात लूट करायचा, त्याप्रमाणे मुंबई महापालिकेतील विरप्पन गँग रस्ते कामांत लूट करीत आहे. कंत्राटदारांच्या प्रेमासाठी मुंबईकरांना खड्यात टाकण्याचे काम सत्ताधारी शिवसेना, पालिका प्रशासन करीत आहेत, असाही आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचा रोल काय आहे, याचे स्पष्टीकरण शिवसेनेने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे यांनी वरीलप्रमाणे आरोप केले.

देशपांडे म्हणाले, रस्ते, खड्डे कामात सत्ताधारी शिवसेनेने करदात्या मुंबईकरांच्या कोटयवधी रुपयांची उधळपट्टी केली. मात्र, मुंबईकरांच्या नशीबी चांगले रस्ते ऐवजी खड्डेच खड्डे आले आहेत.

रस्ते कामांबाबत आधी काढलेल्या १२०० कोटींच्या निविदा रद्द करून नव्याने २१०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येत आहेत. याचा संदर्भ देत देशपांडे यानी आरोप केला की, रस्ते कामांत यापूर्वी घोटाळे केलेल्या ६ कंत्राटदारांना पुन्हा मागच्या दरवाजाने कामे देण्याचे षडयंत्र सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन यांनी रचले आहे. (MNS blames backdoor entry to blacklisted contractors by Shiv Sena)

विरप्पन रस्त्यावर लुटायचा आणि हे महापालिकेत लुटतात. यांची अनधिकृत कामे मोठ्या प्रमाणात सुरू असा दावा करून मनसे नेत्याने शिवसेनेला इशारा दिला की, मनसे त्यांचे हे षडयंत्र रस्त्यावर उतरून हाणून पाडेल.

२१०० कोटींची रस्ते कामे झाल्यावर मुंबईकरांना चांगले रस्ते मिळतील का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

रिकामटेकडया बेडकांचे डराव डराव – शिवसेना

पावसाळ्यात बेडूक डराव डराव करीत असतात. त्याप्रमाणे आता मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने “रिकामटेकडे बेडूक” डराव डराव करून बिनबुडाचे आरोप करीत आहेत, या शब्दात शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing committee chairman Yashwant Jadhav) यांनी मनसेला दिले आहे.

रस्त्यांचे प्रस्ताव शिवसेना बनवत नाही. पालिका प्रशासन बनवते. तसेच, असला प्रस्ताव आमच्या समोर अद्याप मंजुरीला आलेला नाही. जर रस्ते कामांत काही काळेबेरे होत आहे, असा त्यांचा आरोप असेल तर त्यांनी त्याबाबत माहितीसह थेट पालिका आयुक्तांकडे तक्रार करावी.

शिवसेनेला मध्ये आणायची व बिनबुडाचे आरोप करण्याची गरजच काय, त्यांचे नेमके दुखणे काय आहे, असा सवालही यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here