@maharashtracity

नायर रुग्णालय हेळसांड व लहान मुलाच्या मृत्यूचे प्रकरण

मुंबई: वरळी सिलेंडर दुर्घटना प्रकारणाचे पडसाद आज मुंबई महापालिका स्थायी समितीच्या सभेत उमटले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी भाजपला उद्देशून वादग्रस्त विधान केल्याने भाजप (BJP) नगरसेवक आक्रमक झाले. शिवसेना (Shiv Sena) नगरसेवकही पुढे चालून आले. त्यामुळे भाजप व शिवसेना नगरसेवक एकमेकांना भिडले.

प्रारंभी सभागृह नेत्या विशाखा राऊत (Vishakha Raut) यांनी, वरळी दुर्घटना (Worli gas cylinder blast incident) प्रकरणावरून हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत विषयाला वाचा फोडली. वरळी दुर्घटनेतील जखमींना उपचार देण्यात नायर रुग्णालयाने (Nair Hospital) दाखवलेला हलगर्जीपणा निंदनीय असल्याचे राऊत म्हणाल्या. तसेच, वरळी दुर्घटनेतील लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खेद व्यक्त केला.

या विषयावर बोलताना यशवंत जाधव यांनी, नायरमधील घटना व लहान मुलाच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपच्या ११ नगरसेवकांनी आरोग्य समितीचे राजीनामे देणे म्हणजे ‘स्टंटबाजी’ (BJP’s stunt) आहे, असे विधान केले. त्यामुळे भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाले. त्यांनी जाधव यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक जाधव यांच्या मदतीला धावले. त्यामुळे शिवसेना व भाजप नगरसेवक आमनेसामने धडकले व त्यात बराच वेळ शाब्दिक चकमक झाली, शिवराळ भाषा वापरली गेली. यशवंत जाधव यांचा भाजप नगरसेवकांनी एकेरी उल्लेख करीत निषेध व्यक्त केला. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला.

पालिका कामकाज चालविणे महापौरांना अवघड झाले. यावेळी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी (Congress and NCP corporators) मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अखेर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी, पुढाकार घेऊन शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांना शांत राहून जागेवर बसण्याचे आवाहन केले.

काही कालावधीनंतर सभागृहातील तणावपूर्ण वातावरण शांत झाले आणि सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. त्याच विषयावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपली मते मांडली. काही नगरसेवकांनी अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या.

दरम्यान, वरळी येथील गॅस सिलिंडर दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यात नायर रुग्णालयात हेळसांड होऊन एका गंभीर जखमी लहान मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यावरून आक्रमक भाजपच्या ११ सदस्यांनी पालिका आरोग्य समिती सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here