By सदानंद खोपकर
Twitter: @maharashtracity
नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरू होताच संतप्त विरोधी पक्ष सदस्यांनी आधीच्या सरकार काळातील मंजूर कामांना स्थगिती, या विषयावर प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्ष सदस्य अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत जाऊन हाय – हाय, तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत होते. गदारोळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तरे पुकारली. मात्र, गदारोळ सुरुच राहिला. त्यामुळे अध्यक्षांना तीन वेळा दहा मिनिटे व एकदा पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले.
कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकार काळात आधीच्या महा विकास आघाडी सरकारच्या काळातील सर्व मंजूर कामे थांबविण्यात आली असा आरोप केला. पवार म्हणाले, अनेक सरकारे पाहिली, अगदी श्वेत बुकातील कामेही थांबली. हा महाराष्ट्र आहे की कर्नाटक, गुजरात असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करीत जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते पवार बोलत असताना विरोधी सदस्य शेम-शेम अशा घोषणा देत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पवार यांना आठवण करून दिली की, मागील सरकारने त्यांच्या मतदारसंघातील कामेही अडविली होती. अडीच वर्षात भाजप सदस्यांच्या मतदारसंघात एक पैसाही तुम्ही दिला नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. आता सत्तर टक्के स्थगिती उठवल्या. फक्त नियमपालन नाही अशाच कामांवर स्थगिती आहे, त्याबाबतही योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, विरोधी सदस्य गदारोळ करतच होते.
नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी… स्थगिती सरकार हाय हाय, अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले. संपूर्ण प्रश्नोत्तराचा तास या गदारोळात पार पडला.