@maharashtracity

देशात सर्वात जास्त मजुर पाठवलेल्या गुजरातमुळे कोरोना पसरला नाही का? – सचिन सावंत

मुंबई: नरेंद्र मोदी हे भारताचे ७५ वर्षांतील सगळ्यात अपयशी व कर्तृत्वशून्य सरकारचे पंतप्रधान आहेत. आठ वर्षांच्या कारकिर्दीत बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, महागाई, ८४% लोकांचे घटलेले उत्पन्न, चीनचे संकट आदी मुदद्यांवर त्यांच्याकडे उत्तर नसल्याने ते अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा आटापिटा करत आहेत. मागील ३ दिवसांपासून त्यांचा असत्याचा विलाप सुरु असल्याचे अख्खा देश पाहतो आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) खोटारडेपणाचा बुरखा फाडत त्यांचे सर्व दावे खोडून काढत सावंत म्हणाले की, राज्यांनी लॉकडाऊन (lockdown) केला म्हणून करावा लागला असे नरेंद्र मोदी म्हणतात. परंतु, मोदींनी कोणत्याही मंत्रालयाशी चर्चा न करता लॉकडाऊन जाहीर केला हे माहितीच्या अधिकारातून (RTI) समोर आले आहे.

जर राज्यांमुळे लॉकडाऊन केला होता तर २१ दिवसांत कोरोनावर मात करु हे मोदी का म्हणाले? त्यानंतर लॉकडाऊन कालावधी अनेकदा का वाढविला? टाळ्या, थाळ्या व घंटा का वाजवायला लावल्या? असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले.

महाराष्ट्र काँग्रेसमुळे व मुंबईतील उत्तर भारतीय स्थलांतरित मजूरांमुळे (Migrant workers) कोरोना पसरला हा मोदींचा असत्याचा कांगावा आहे. मोदींनी २४ मार्च २०२० रोजी अचानक लॉकडाऊन जाहीर केला. रात्री ८ वाजेच्या भाषणाबरोबर मोदींनी ४ तासाची मुदत देत देशात लॉकडाऊन लावला. ते अधिक भितीदायक होते. २१ दिवसांत कोरोनावर मात करु म्हटल्याची मुदत १४ एप्रिलला संपली. पण कोरोना मात करु शकले नाहीत.

महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनने (Shramik Train) मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवल्याने कोरोना पसरला हा त्यांचा दावाही तेवढाच हास्यास्पद व खोटा आहे. पहिली श्रमिक ट्रेन १ मे रोजी सुरू झाली. म्हणजे ३८ दिवसांनंर! गुजरातमधून (Gujarat) १०२७ ट्रेन निघाल्या व १५ लाख स्थलांतरित मजूर त्यांच्या त्यांच्या घरी परत पाठवले. तर दुसरीकडे महाराष्ट्रातून (Maharashtra) ८४४ ट्रेनमधून १२ लाख मजूर त्यांच्या घरी परतले.

गुजरातमधून देशातील सर्वात जास्त ट्रेन सोडल्या व सर्वात जास्त मजूर घरी गेले. मग कोरोना गुजरातमधून जास्त पसरला पाहिजे होता, महाराष्ट्रातूनच कसा पसरला? आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi – MVA) मजूरांना थांबवले पाहिजे होते असे भाजपा (BJP) म्हणत असेल तर मोदींनी गुजरातमधील मजूरांना का नाही थांबवले? अशी प्रश्नांची सरबत्ती करत सावंत यांनी मोदींच्या बोलण्यातील खोटेपणा उघड केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here