@maharashtracity

मुंबई: साकीनाका येथे झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक झाली असून त्यांच्यावरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (fast track court) चालवणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी शनिवारी येथे दिली.

साकीनाका येथे घडलेल्या या पाशवी बलात्कार (Sakinaka rape case) प्रकरणातील पीडितेचा आज मृत्यू झाला. या घटनेची तातडीने दखल घेत शिंदे यांनी जे. जे. रुग्णालयात (JJ Hospital) जाऊन पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच या पीडित महिलेची आई आणि मुलगी यांचे सांत्वन केले. पीडित महिलेच्या दोन्ही मुलींचा पुढील शिक्षणाची जबाबदारी शासन आणि शिवसेना (Shiv Sena) स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले.

या घटनेतील महिलेसोबत घडलेली घटना संतापजनक आणि निंदनीय असून या प्रकरणातील प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. या आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जाहीर केले आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

या आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून अशा कारवाईतून गुन्हेगारांवर जरब बसली तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असे शिंदे म्हणाले. महिला सुरक्षेबाबत शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पीडित महिलेच्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून स्थानिक आमदार दिलीप लांडे (Sena MLA Dilip Lande) यांच्या माध्यमातून त्याना लागेल ती मदत पोहोचवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीडित महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तातडीची बाब म्हणून शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदतही दिली.

शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनात येणार

महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या शक्ती कायद्याचा (Shakti Bill) मसुदा विधिमंडळाच्या कायदाविषयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आला असून, येत्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) ही समिती आपला अहवाल तयार करून विधानसभेच्या पटलावर ठेवेल.

त्यांनतर या कायद्याबाबत पुढील निर्णय होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here