सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि TheNews21 ने उघडकीस आणला शेतकरी कर्जमुक्ती घोटाळा

मुंबई

सांगली (Sangli) जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील (loan waiver scheme) घोटाळ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केलेले आरोप खरे ठरले आहेत. मनसेने उघडकीस आणलेल्या या घोटाळ्यात १४१ व्यक्तींनी कर्जमाफी योजनेचा गैरलाभ घेतल्याचं उघड झालं आहे.

यासंदर्भात TheNews21 ने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावरच लाभार्थींना संरक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केल्याने पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यातून या घोटाळ्यातील दोषीविरोधात कारवाई होणार आहे. 


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी (farmers) ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांची माहिती तलांठ्यामार्फत उपलब्ध करून शासकिय लेखा परीक्षकांमार्फत (auditor) तपासणी करण्याबाबत आदेश दिलेले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ चा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

यातील ज्या व्यक्तींची अद्याप शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा प्रकरणी प्राप्त होणारी रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये वर्ग न करता शासनास परत करावी. तसेच गैरलाभाच्या प्रकरणांपैकी ज्या व्यक्तींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे त्या व्यक्तींकडून ती रक्कम वसूल करून यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिल्याचे जिल्हाधिकारी (district collector – DM) डॉ. अभिजीत चौधरी (Dr Abhijit Chaudhari) यांनी आज सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी गोटखिंडी गावातील शेतकरी कर्जमाफी गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. मनसेच्या मागणीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील वित्तीय संस्थेमध्ये ७/१२ नसताना कर्जवाटप करून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने १२ व्यक्तींवर यापुर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशाच पध्दतीने जिल्ह्यात इतर ठिकाणी देखिल या योजनेचा गैरलाभ घेण्यात आल्याची शक्यता असल्याने बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांची माहिती तलांठ्यामार्फत उपलब्ध करून शासकिय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिलेले होते. 

“महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील घोटाळा केवळ सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. इतर जिल्ह्यांमध्येही असाच गैरप्रकार झाला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने पैसे लुबाडणारी एक मोठी यंत्रणा राज्यात कार्यरत असून त्यांना राजकीय आश्रय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावर बारीक लक्ष ठेवून आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेची चौकशी व्हायला हवी.”
कीर्तिकुमार शिंदे, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

यामध्ये मिरज तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांची (Nationalised Banks) यादी वगळता जिल्ह्यातील कर्जखात्यांची शासकिय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी महात्मा जोतिराव फुले शेतकारी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेचा गैरलाभ घेतला असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

गैरलाभ घेतलेल्या प्रकरणांमध्ये व्यक्तींच्या नावे शेतजमीन नसताना, विना ७/१२ उताऱ्याची ६० कर्जप्रकरणे, पीक कर्जाव्यतीरीक्त सामान्य कर्जे, गाय/ म्हैस/ शेळी बाबतची कर्जे, इतर व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाचा समावेश चूकीच्या पध्दतीने कर्जमुक्ती योजनेमध्ये करणे अशी ५२ प्रकरणे, क्षेत्र नसताना बनावट ७/१२ दाखल करून घेतलेली कर्जाची ७ प्रकरणे, जमीन विक्री केलेली असताना कर्ज उचलीची ७ प्रकरणे, ७/१२ आहे परंतु, जादा कर्जवाटपाची ३ प्रकरणे, यापूर्वी गुन्हा दाखल असलेली १२ प्रकरणे, अशी एकूण १४१ प्रकरणे असून यातील अपात्र ११० कर्ज खात्यांवर सुमारे ९२ लाख ४२ हजार ८३३ रूपयांची गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे.

गैरलाभ घेतलेल्या प्रकरणांचा बँकनिहाय पुढीलप्रमाणे आहे – बँक ऑफ बडोदा मधील ३० अपात्र खात्यांपैकी २५ खात्यांवर ७ लाख ४३ हजार ६६३ रूपये, बँक ऑफ इंडिया ३९ अपात्र खात्यांपैकी ३३ खात्यांवर ३६ लाख १३ हजार ८१३ रूपये, एचडीएफसी बँक मधील ४ अपात्र खात्यांवर १ लाख ९८ हजार १३ रूपये, बँक ऑफ महाराष्ट्र मधील एका अपात्र खात्यावर ३० हजार २४९ रूपये, कार्पोरेशन बँक कराड / वांगी मधील ३२ अपात्र खात्यांपैकी १७ अपात्र खात्यांवर २० लाख ६ हजार ५३१ रूपये, बँक ऑफ बडोदा कराड मधील ३ अपात्र खात्यांवर ३ लाख ९४ हजार १३२ रूपये, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली मधील ३२ अपात्र खात्यांपैकी २७ अपात्र खात्यांवर २२ लाख ५६ हजार ४३२ रूपये, अशा एकूण ११० अपात्र कर्ज खात्यांवर ९२ लाख ४२ हजार ८३३ रूपये गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here