@maharashtracity
मुंबई: मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का, याची काळजी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी करू नये. पण संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले की, मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बुडवतील. याची काळजी संजय राऊत यांनी करू नये. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही समर्थ आहोत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ‘ पे रोल’वर राहून पवार यांचा अजेंडा चालविणारे संजय राऊत हे अंतिमतः वाट लावणार आहेत व आपल्याला खड्ड्यात घालणार आहेत, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.
त्यांनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना युती तोडण्यासाठी भरीस घातले. भाजपासोबतची (BJP) युती तोडून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसशी (Congress-NCP) हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेने मुस्लिम मतांच्या (Muslim vote bank) मागे लागून आपला मूळ पाया संपविला. यामुळे आपल्याला मानणारी जनता तसेच आपले जुने नेते – कार्यकर्ते सोबत राहणार नाहीत, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही.
पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबाबत १९ बंगल्यांचा विषय एक वर्षापूर्वी मांडण्यात आला. या काळात संजय राऊत याविषयी बोलले नाहीत. संजय राऊत स्वतः किंवा त्यांचे सीए किंवा त्यांच्या मुलींपर्यंत विषय येत नव्हता, तेव्हा त्यांच्यासाठी सर्व काही आलबेल होते. आता त्यांच्या गळ्याशी विषय आल्यानंतर त्यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण शिवसेना (Shiv Sena) वापरण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील शिवसैनिकांची संख्या कमी पडली तर नाशिक (Nashik) व पुण्यातून (Pune) शिवसैनिकांना आणले. ही पत्रकार परिषद शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरील हल्ले परतविण्यासाठी होती तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), सुभाष देसाई (Subhash Desai) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सेनेचे नेते का उपस्थित नव्हते, असा प्रश्न निर्माण होतो.
ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना भाजपा घाबरत नाही. भाजपाच्या विरोधकांनी हे ध्यानात घ्यावे की, हा नवा भाजपा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न शंभर जणांनी केला तर पाठिंब्यासाठी भाजपाचे एक हजार कार्यकर्ते पोहोचले. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या हत्येचा प्रयत्न झाला तर त्यांच्या समर्थनासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. हल्ले कराल तर निराशेशिवाय काहीही हाती लागणार नाही.
त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची मर्यादा साडेसात लाखापर्यंत वाढवली पण मराठा युवकांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिली जाणारी दहा लाख रुपये बिनव्याजी कर्जाची योजना ठप्प केली.
महाविकास आघाडी (MVA) सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारकाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी दोन वर्षात पाठपुरावा केला नाही. या सरकारला मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याची इच्छा नाही. मराठा समाजासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणाला भाजपाने पाठिंबा दिला आहे. मराठा समाजासाठी जे कोणी रस्त्यावर उतरतील त्यांना भाजपा पाठिंबा देईल.