By Santosh More

Twitter: @maharashtracity

मुंबई: कोकणातील बारसू येथील प्रस्तावित ऑइल रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधामुळे सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारची अडचण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी या सरकारचे प्रतिनिधी वेगवेगळ्या नेत्यांना भेटून प्रकल्पासंदर्भातील गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत Minister Uday Samant) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. विकास प्रकल्पांना राष्ट्रवादीचा विरोध नाही, असे स्पष्ट करतानाच पवार यांनी सांगितले की, स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे गैरसमज दूर करूनच प्रकल्प राबवला गेला पाहिजे.

शरद पवार यांनी आज सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई इथे माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. तत्पूर्वी मंत्री उदय सामंत यांनी सकाळी पवार यांची वाय बी चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, 

बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery project) विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला. या विषयाबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यावर स्थानिक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यातून काय निष्पन्न होते हे पाहण्याची गरज आहे. यासाठी उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. इतर काही प्रश्न असतील तर त्यावरही मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी सामंत यांनी दाखवली. 

पवार पुढे म्हणाले, एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आली. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे. उद्या होणाऱ्या बैठकीत काही मार्ग निघाल्यास आनंद आहे. जर नाही निघाला तर त्यावर मार्ग काढण्यासंबंधात चर्चा करता येईल, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here