@maharashtracity

सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेत भाजपला सत्तेपासून दूर खेचण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीची राष्ट्रवादीची तयारी आहे. मात्र, त्यात राष्ट्रवादीचा सन्मान झाला पाहिजे. अन्यथा स्वतंत्र मैदानात उतरण्यास आम्ही सक्षम आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन खा. शरद पवार यांनी सोलापूर येथे केले. हा एक प्रकारे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाला इशारा समजला जात आहे. (Sharad Pawar warn Congress for respectable alliance)

गत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आघाडी संदर्भात राष्ट्रवादीला झुलवत ठेवत अगदी शेवटच्या क्षणाला निवडणुका स्वतंत्र लढविण्याची घोषणा केली होती. याची खंत शुक्रवारी झालेल्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त झाली.

हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास पालकमंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष महंम्मदखाँ पठाण, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकरी हिताचे धोरण जे राबवितात त्यांना आमचा सदैव पाठिंबा असेल. मात्र, केंद्रातील भाजपचे सरकार हे शेतकरी व कष्टकरी विरोधी आहे. (BJP government is anti farmers) त्यामुळे शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजपला जिल्हा निवडणुकीत खड्यासारखे बाजूला सारा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेले महाराष्ट्र राज्य चुकीच्या हातात जाऊ नये. म्हणूनच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने राजकीय आघाडी करून सत्ता स्थापन केली असल्याचे खा. शरद पवार म्हणाले.

सोलापूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

याप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, आ.यशवंत माने, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, उत्तमराव जानकर, राजेंद्र हजारे, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, लतीफ तांबोळी, निरंजन भूमकर यांच्यासह पक्षाचे बहुसंख्य नेते-कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी केंद्रीय कृषी मंत्री पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जे पक्षाला सोडून गेले त्यांना जनतेने सोडून दिले. अनेकांनी पक्ष सोडून दिल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी आपण विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण राज्याचा दौरा केला.

सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी असल्याने दौऱ्याची सुरुवात येथून केली. सोलापूर जिल्ह्याने आपल्याला भरभरून दिले असल्याचे पुढे बोलतांना खा.पवार म्हणाले.

याप्रसंगी बोलतांना कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी पक्ष मोठा झाला तरच कार्यकर्ता मोठा होतो. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात जे पक्षाला सोडून गेले. ते पुन्हा पक्षात आले तर त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी, असे आवाहन केले.

एक रकमी एफआरपी धोकादायक

साखर कारखानदारांनी ऊसाची एकरकमी एफआरपी द्यावी, असे मत काही लोकांचे आहे. मात्र, कारखान्याला ऊस घालून साखर निर्माण होईपर्यंत बराच कालावधी जातो. त्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी (FRP) देतांना कारखान्यांना ती कर्जाऊ काढून द्यावी लागेल. असे झाल्यास कर्जाऊ रकमेचे व्याज ऊस उत्पादकांकडूनच कारखाने वसूल करतील. त्यामुळे एकरकमीचे धोरण ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदारांसाठी धोकेदायक आहे. गुजरात राज्यातही तीन टप्प्यात एफआरपी देण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण याप्रसंगी बोलताना खा.पवार यांनी दिले.

लेकी सारखी वागणूक द्या

मी अधिकृतपणे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नसलो तरी मागील आठ महिन्यापासून खा.शरद पवार यांच्या संपर्कात आहे. माझा लवकरच राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. मी पक्षात नवा असल्याने येथील नेत्या-कार्यकर्त्यांच अधिक माहिती आपल्याला नाही. त्यामुळे पक्षात आपणास सुने सारखे नको तर लेकी सारखी वागणूक द्या, अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना महेश कोठे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here