By सदानंद खोपकर

@maharashtracity

मुंबई: भारतीय जनता पक्ष (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे समर्थक आमदार यांनी अन्य छोटे राजकीय पक्ष अन् अपक्ष आमदार यांच्या पाठिंब्याने आज विधानसभा विशेष अधिवेशनात मतविभागणीतून बहुमत सिद्ध केले. भाजप आणि एकनाथ शिंदे युतीने एकूण १६४ मते मिळाली, तर महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) ९९ मते मिळाली.

समाजवादी पक्षाचे (Samjawadi Party) अबू आझमी, रईस शेख आणि एम्.आय्.एम्. पक्षाचे आमदार फारूख अन्वर शाह हे तटस्थ राहिले. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभु यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) बाजूने मतदान करण्याचा, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी भाजप आणि शिंदे गटाला मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला होता.

सोमवारी सकाळी ११ वाजता विधानसभा कामकाजास प्रारंभ झाला. प्रथम अध्यक्षांनी तालिका सभापती म्हणून आशिष शेलार, चेतन तुपे, संग्राम थोपटे, योगेश सागर आणि संजय शिरसाट यांच्या नावाची घोषणा केली.

त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारसाठी विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले.

रविवारी विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीच्या वेळी प्राप्त मतसंख्येपेक्षा महाविकास आघाडीचे बळ आज ८ मतांनी घटले असे स्पष्ट झाले.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना १०७ मते मिळाली होती. परंतु, बहुमताच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) काही आमदार अनुपस्थित होते.

भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार यांनी बहुमताचा आकडा पार केल्यावर विजयी गटाच्या आमदारांनी सभागृहात ‘भारतमातेचा विजय असो’, वन्दे मातरम्, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो’, ‘जय श्रीराम’ या घोषणा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here