शिवसेना प्रवक्त्या प्रा डॉ मनीषा कायंदे यांची महाविकास आघाडी सरकारकडे मागणी
मुंबई: युद्धामुळे युक्रेनमधून भारत आणि महाराष्ट्रात परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आणि विधानपरिषद सदस्य प्रा डॉ मनिषा कायंदे यांनी केली.
पुरवणी मागण्यांवर बोलतांना प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी मंगळवारी युक्रेनमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानभवनात बैठक घेतली. या बैठकीला बैठकीला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संचालक माधुरी कानिटकर, नॅशनल मेडिकल कौन्सिलचे प्रतिनिधी, विभागाचे सचिव उपस्थित होते.
या बैठकीत युक्रेनमध्ये होणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाबद्दल माहितीपर सादरीकरण करण्यात आले. युक्रेनमध्ये सुमारे 33 विद्यापीठे वैद्यकीय शिक्षण देतात, 18000 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर महाराष्ट्रातून सुमारे 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
युद्धजन्य परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना भारतात मायदेशी परतावे लागले, त्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे की ज्यांनी या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. या संदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचे देखील मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
देशमुख म्हणाले की, जे विद्यार्थी सप्टेंबरमध्ये गेलेले आहेत, त्यांना पुन्हा 2022 मध्ये ‘नीट’ (NEET) परीक्षा देता येईल व पुढचे शिक्षण भारतात घेता येईल. जे विद्यार्थी इंटर्नशीपपर्यंत पोचलेले आहेत, त्यांना इथे महाराष्ट्रात इंटर्नशिप पूर्ण करता येईल. परंतु जे विद्यार्थी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षात आहेत, त्यांच्यासमोर मात्र प्रश्न चिन्ह उभे राहत आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी आरोग्य विद्यापीठाच्या संचालक माधुरी कानिटकर यांनी पुढाकार घेतला व ऑनलाइन पद्धतीने वैद्यकीय शिक्षण देण्याची तयारी दाखवली.
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी अशी मागणी केली की या विद्यार्थ्यांचे नुकसान कशा पद्धतीने कमी करता येईल, याबद्दल सरकारने विचार करावा. वैद्यकीय जागा वाढवाव्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केल्यास डॉक्टरांची कमतरता भासणार नाही, मेडिकलच्या जागा वाढल्यामुळे शिक्षणाचा खर्चदेखील कमी होईल, असे कायंदे यांनी सुचवले.
जागा कमी असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण आज महाग झाले आहे, तर सीट्स वाढवल्यामुळे फी देखील कमी होईल, असेही मत प्रा कायंदे यांनी व्यक्त केले.