समस्या सोडविण्याच्या आमदार रविंद्र वायकर यांची सुचना

Twitter: @maharashtracity

मुंबई: जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा   रुग्णालय (HBT Trauma Hospital) अत्यंत महत्वाचे असून पश्चिम उपनगरातील नागिरिकांसाठी हे रुग्णालय कुपर रुग्णालयाला (Cooper Hospital) पर्याय ठरू शकते. मात्र या ठिकाणी येणारे रुग्ण असंख्य असुविधांना सामोरे जात असून येथील तक्रारींचा पाढा स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनीच वाचला. 

येथील आरोग्य असुविधांपासून ते कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वायकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्यासोबत बैठक घेऊन येथे सुविधा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.  

कोविड काळ सुरु झाल्यापासून त्याशिवाय गेल्या काही वर्षांत हृदय विकाराचे (heart attack) प्रमाण वाढल्याने या रुग्णालयाच्या नजीकच्या परिसरातील गोरगरीब रुग्णांची उपचारासाठी धावाधव होत आहे. या नागरिकांना दिलासा देण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा रुग्णालयात (Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray hospital) तात्काळ कार्डीयाक विभाग सुरू करण्यात यावा, तसेच तसा प्रस्ताव तयार करुन पालिकेच्या आयुक्तांकडे पाठविण्यात यावा, अशी सुचना आ. रविंद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांनी उपायुक्त कुऱ्हाडे यांना केली.

आ. वायकर म्हणाले की, या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवांबाबत रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या. यावर मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येत आहे. या रुग्णालयात विविध आजारांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची नेहमी गर्दी असते. मात्र, एवढ्या मोठ्या रुग्णालयात कार्डीयाक विभाग (cardiac department)  नसल्याने आपत्कालिन प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना खाजगी रुग्णालयात अथवा कुपर रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. यामुळे बऱ्याच वेळा उपचारास विलंब झाल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागल्याचे आमदार वायकर म्हणाले.

लॅबची सेवा मोफत करा 

रुग्णालयातील पॅथलॉजी लॅबमध्ये (Pathology lab) रिपोर्ट बनविण्यास विलंब लागत असेल तर रुग्णालयाच्या जवळील लेबोरेटरी यांची नेमणुक करण्यात यावी. तेथे रुग्णांना अथवा रुग्णांच्या नातेवाईकांना टेस्टसाठी पाठविण्यात यावे, मात्र, त्या लॅबोरेटरींनी रुग्णांकडून अथवा रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे न घेता मनपाने ते पैसे भरावेत. मुंबई महानगरपालिकेचे हे ट्रॉमा रुग्णालय असल्याने रुग्णालयातील आर्थोपेडीक बेडच्या संख्येत वाढ करण्यात यावी. तसेच रुग्णालयात काही ठिकाणी सी. सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी सुचनाही वायकर यांनी यावेळी केली.

कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर नाहीत

समजलेल्या माहिती नुसार येथील कंत्राटी कामगारांचे दोन ते तीन महिन्यांनी पगार होत असतात. अद्याप दोन महिन्याचा पगार देण्यात आला नसल्याचे येथील कामगारांकडून समजते. रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या मल्टिपर्पज कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यात येत नसल्याच्या तक्रारी केल्या. यावर कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार पगार देण्यात यावा, कर्मचाऱ्यांना पगाराची स्लिप व भविष्यनिर्वाह निधी भरल्याची पावती देण्यात यावी, अशी सुचनाही वायकर यांनी हॉस्पिटल प्रशासन तसेच कंत्राटदाराला दिली. 

कोविड सुरु झाल्यापासून येथील कंत्राटी कामगारांचे हाल सुरु आहेत. कोविडच्या रुग्णसेवेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वापरुन घेतले असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. तद्नंतर त्यांना भत्ते आणि इतर सुविधा दिल्या नसल्याच्या तक्रारी येथील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच बदलत्या कंत्राटादारांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनास उशिर होतो. या कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवेदने कोणीच ऐकून घेत नसल्याने आपल्या व्यथा नेमकी कोणाकडे मांडायची असा प्रश्न त्यांना पडला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here