@maharashtracity
भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनीच सवय आहे, असा सणसणीत टोला भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांना लगावला आहे.
तसेच, भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही, असा विश्वासही प्रभालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsath) यांनी व्यक्त केला.
आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) शिवसैनिकांना (Shiv Sainik) डावलले जात आहे. गेले २५ वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठीसुद्धा उमेदवार दिलेले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे शिंदे म्हणाले.
स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे ते भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा टोलाही प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी लगावला आहे.
शिवसेनेला मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्यामुळेच पालघर लोकसभा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित, शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सदाशिव लोखंडे, मध्य दक्षिण मुंबईसाठी विद्याधर गोखले, सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे, ताडदेव महापालिका प्रभागासाठी अनिल सिंग, अंधेरीतील नगरसेविका संध्या यादव असे ३५ ते ४० उमेदवार वेळोवेळी दिलेले आहेत. आताही शिवसेनेला योग्य उमेदवारांची वानवा आहे म्हणूनच ते फोडाफोडीची भाषा करित आहेत, असे भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे.
मुंबईमध्ये एसआरएची (SRA) घरे बांधताना प्रतिचौरस फूट १५०० रुपये दराने बांधकाम केले जात आहे. मात्र, पालिका आश्रय योजनेत घरे बांधताना प्रति चौरस फूट ४६०० रुपये दराने घरे बांधत आहे. हाच मोठा घोटाळा आहे. यावर स्थायी समिती अध्यक्षांनी बोलावे, असे आवाहन भाजपचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केले आहे. (Prabhakar Shinde alleged scam in BMC housing scheme).