@maharashtracity
मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) म्हणजे तमाशातला ‘गांजाडीया’ आहेत, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी टीका केली आहे.
तसेच, किरीट सोमय्या हे केवळ आरोप करण्यासाठी ठेवलेला माणूस आहेत. त्यांना जसे सांगितले जाते तसे ते बोलतात. मात्र त्यांनी केवळ भ्रष्टाचाराचे (corruption) आरोप न करता त्याबाबत काही पुरावे असतील तर ते सादर करावेत, असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना दिले आहे.
मुंबई महापालिकेत कोविड काळात कोट्यवधी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप (corruption during covid pandemic by BMC) भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. महापौर किशोरी पेडणेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
त्याबाबत पत्रकारांनी महापौर यांना विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. मात्र, यशवंत जाधव यांनी यापूर्वीच सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना उत्तरे दिली असून यापुढेही उत्तरे देण्यासाठी ते सक्षम असल्याचे महापौर यांनी सांगितले.
वास्तविक, आम्ही मुंबईकरांचे, पक्षाचे काम करत आहोत. चांगले काम करत आहोत म्हणून मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव घेऊन आमचे लक्ष विचलित करण्यासाठी किरीट सोमय्या यांच्याकडून जाणीवपूर्वक असे आरोप केले जात आहेत. मात्र आम्ही आमचे लक्ष विचलित होऊ देणार नाही, असे महापौर यांनी म्हटले आहे.