@maharashtracity

बेस्ट व लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी -: मुख्यमंत्री

इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल

निसर्गचक्र बदलत असल्याने पर्यावरण जपलं पाहिजे

मुंबई: बेस्ट (BEST) व लोकल (Local Train) ही मुंबईची जीवनवाहिनी (Lifeline of Mumbai) आहे. कोरोना कालावधीत बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता उत्कृष्ट बससेवा दिली. इलेक्ट्रिक बस (e-Bus) हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

बेस्ट दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बस स्थानकाचे उदघाटन व इलेक्ट्रिक बस गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आणि महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारच्या सुमारास करण्यात आले.

याप्रसंगी, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aaditya Thackeray), उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, आ.सदा सरवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना कालावधीत ‘बेस्ट’ सेवा

कोरोनाच्या काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली व कुठेही अडचण येऊ दिली नाही. तसेच, बेस्ट बस चालक, वाहक यांनी, जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्ट प्रशासनाचे कौतुक केले.

इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल

शिस्तबद्ध सेवा ही बेस्टची ख्याती आहे. बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ती मदत केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी यावेळी बेस्टला दिली. बेस्टच्या ताफ्यात पर्यावरण पूरक अशा इलेक्ट्रिक बस दाखल होत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज २४ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात आतापर्यंत २२२ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. या बस चार्जिंग करण्यासाठी शिवाजी नगर, मालवणी आणि बॅक बे डेपो येथे असणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे आधुनिकरण होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, आम्ही आमच्या वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे चालावे, असे नियोजन आहे.

रेल्वे सेवा, हॉटेल्स बाबत लवकरच निर्णय

मुंबईसह अन्य काही ठिकाणी हळूहळू कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. त्यामुळे सरकार एकेका गोष्टींवरचे निर्बंध सावधगिरी बाळगून शिथिलता आणण्याचा निर्णय घेत आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चे मालक भेटून गेले व त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी अशी विनंती केली असून लोकल प्रवासाबाबतही देखील लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच, गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलते आहे. आपलं पर्यावरण जपलं गेलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here