@maharashtracity

धुळे: खरेदी- विक्री संघामार्फत ज्वारी खरेदी करताना खर्‍या शेतकर्‍यांना डावलण्यात आले. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांकडून एक हजार ते १२०० रुपये दराने खरेदी केलेली ज्वारी २ हजार ६२० रुपये दराने शासनाला विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय करुन ज्वारी खरेदीत घोटाळा करणार्‍या खरेदी-विक्री संघातील दोषींची चौकशी करावी. तसेच त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मंगळवारी तालुका शिवसेनेने (Shiv Sena) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

या संदर्भात तालुका शिवसेनेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागातर्फे पणन महासंघाने खरेदी-विक्री संघामार्फत धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची ज्वारी खरेदी केली आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी ५ एप्रिल २०२१ पासून खरेदी- विक्री संघात नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी केवळ ५० ते ६० टक्के शेतकर्‍यांची ज्वारी खरेदी-विक्री संघाने खरेदी केली.

तसेच दि.५ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ज्यांचे नाव रजिस्टरमध्ये दिसत नाही, अशा २०० ते २५० लोकांकडून बेकायदेशीरपणे ज्वारी खरेदी करत घोटाळा करण्यात आला.

वरील कालावधीत ३८० शेतकर्‍यांकडून खरेदी-विक्री संघाने ज्वारी खरेदी केली आहे. व्यापार्‍यांनी त्यातील बहुतांश शेतकर्‍यांकडून १ हजार ते १२०० रुपये दराने ज्वारी खरेदी करुन येथे २ हजार ६२० रुपये दराप्रमाणे शासनाला विकली आहे. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा संशय आहे.

त्यामुळे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन व पणन महासंघाचे संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन घोटाळ्यात ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत म्हस्के, धनराज पाटील, तालुका संघटक देवराम माळी, विलास चौधरी, दादाभाऊ माळी, गितेश पाटील, दिनेश पाटील, हेमराज पाटील, ज्ञानेश्‍वर वाघ, बादल पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here