@maharashtracity

पुणे भाजपाचे शहर चिटणीस सुनील माने यांचे आवाहन

पुणे: ठाकरे सरकार दादरच्या इंदुमिल परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत (memorial of Dr Babasaheb Ambedkar) तारखांवर तारखा जाहीर करीत जनतेस झुलवत ठेवत आहे. बाबासाहेबांच्या स्मृती जिवंत राखणाऱ्या प्रकल्पांची कामे रखडल्याने केवळ मतांच्या राजकारणासाठी ठाकरे सरकार (Thackeray Sarkar) बाबासाहेबांचा वापर करत आहे, असा आरोप भाजपचे (BJP) शहर चिटणीस सुनील माने (Sunil Mane) यांनी केला.

डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेची छपाईदेखील ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच रखडली. न्यायालयाने कान उपटल्यानंतरही सरकार हललेले नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. माने यांनी सांगितले की, २००४ मध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress manifesto) आंबेडकर स्मारकाचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने रखडविलेल्या या स्मारकासाठी मोदी सरकारनेच पुढाकार घेऊन दादरच्या इंदू मिलची २३०० कोटींची जमीन एकही पैसा न घेता महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते २०१५ मध्ये स्मारकस्थळाचे भूमिपूजन झाले. फडणवीस सरकारने (Fadnavis government) स्मारकाच्या कामास गती दिली. आघाडी सरकारच्या काळात काम थंडावले असून कामाला विलंब होत असल्याचे कारण देत खर्चाचे आकडे वाढविण्याचा उद्योग सुरू आहे, असा आरोप सुनील माने यांनी केला.

२०१४ मध्ये साडेचारशे कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या दिरंगाईच्या धोरणामुळे एक हजार कोटींहून अधिक खर्चावर जाणार आहे. काँग्रेसने चालढकल केल्याने अखेर लिलावाच्या अवस्थेत गेलेले लंडनमधील (London) बाबासाहेबांचे निवासस्थानही फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळेच महाराष्ट्र सरकारला घेता आले, याची आठवणही सुनिल माने यांनी करून दिली.

जपानमधील (Japan) विद्यापीठातही पुतळ्याच्या रूपाने उभे राहिलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचे अनावरण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले होते. जगभरातील अनेक देश बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत असताना ठाकरे सरकार मात्र, राष्ट्रीय स्मारकाच्या पूर्ततेसाठी लागोपाठ मुदतवाढ घेत आहे, असा आरोप माने यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here