स्पेन आणि ठाण्यात कांड करण्यासाठी शूटर नेमले?

Twitter: @maharashtracity

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर (Gangster Subhash Sing Thakur alias Babaji) याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठाणे महापालिकेतील (TMC) अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे.  

ठाणे पालिकेतील (Thane Municipal corporation)  प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड (Dr Jitendra Awhad) यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे.  (Maharashtra.city या ऑडियो क्लिपची पुष्टी करत नाही)

या तथाकथित संभाषणात आहेर म्हणत आहे की, “माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं तेव्हा रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असं मी क्रिएट करून ठेवलंय. पोलीस अधिकाऱ्यांना पटवून ठेवलं आहे. आव्हाड माझं केव्हाही काही करू शकतो… असं मी क्रीयेट करून ठेवलं आहे.”

आहेर पुढे बोलत आहे की, “बाबजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये (Spain) कामाला लावले आहेत. नताशाचा (जितेंद्र आव्हाड यांची विवाहित कन्या) पत्ता शोधला आहे. त्याचा जावई ठाण्यात नाही आला तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली (आहे). तो असा नाही आला ना (तर), त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे. स्पेन एवढं मोठं नाही. त्याचा (आव्हाड यांचा जावई) विकास कॉम्प्लेक्स (चा) पत्ता आहे, त्याच्या आई – वडिलांच्यासोबत एक कांड केला तर तो आई- बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली (आहे).”

या ऑडियो क्लिप मध्ये पुढे असे म्हटलेले आहे की, त्याचा (आव्हाड) गेम करणार, त्याच्या मुलीला रडायला लावणार, म्हणजे त्याला कळणार मुलीचे दुःख काय असत? प्लानिंग केलं आहे. तो साप आहे. मी सर्व प्लान केला आहे. त्याला देखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो. आपली फॅमिली उध्वस्त होऊ शकते. मुलीला काहीही होऊ शकते, तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो. तेव्हा तो शांत होईल. मला ठेचायचा आहे त्याला !”

“माझ्या माणसाला विचारा सुटकेस भरून बाबाजीकडून पैसे येतात. बाबाजी माझ्यासाठी लीगल प्रॉपर्टीसाठी काम करतो,” असे महेश आहेर याने या संभाषणात म्हटले आहे. 

दरम्यान, अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलीस तक्रारही करणार नाही. कारण, पोलीस काय करणार नाहीत, हे आपणांस माहित आहे, असे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नेता कोणीही असो, अगदी जितेंद्र आव्हाड असले तरी त्यांना संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here