@maharashtracity

धुळे: शहरातील प्रसिध्द सोने व्यापार्‍यासह माजी नगरसेवकाच्या बंगल्यात शिरुन चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. घर मालक ऐनवेळी आल्याने सराफाच्या बंगल्यातून चोर पसार झाले. मात्र, जवळ असलेल्या माजी नगरसेवक सोनल शिंदे यांच्या बंगल्यातून चांदीची मुर्ती चोरुन नेली. भर वस्तीत झालेल्या चोर्‍यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

धुळे (Dhule) शहरातील स्टेशन रोडवरील कादरी हॉस्पिटलसमोर प्रसिध्द सोने व्यापारी अजय नाशिककर यांच्या मालकीचा सुशील बंगल्यासह माजी नगरसेवक सोनल शिंदे यांचे घर काल रात्री १० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडले.

व्यापारी अजय नाशिककर या बंगल्याचा वापर रेस्ट हाऊस प्रमाणे करतात. अजय नाशिककर यांचा मोठा मुलगा अक्षय दहा वाजेच्या सुमारास मित्रांसह येथे आला. त्याला घरातील लाईट चालू असल्याचे दिसले. घरात प्रवेश करीत असतांनाच दोघे जण पळाले. चोरांनी दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून बंगल्यातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या होत्या. त्यात काही महागड्या वस्तूंचे नुकसान झाले असल्याचे समजते. परंतु, काही चोरी झाली नसल्याचे अजय नाशिककर यांनी सांगितले.

दरम्यान, चोरट्यांनी तिथून पसार होतांना जवळच राहणार्‍या माजी नगरसेवक सोनल शिंदे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. शिंदे यांच्या बंगल्याचा मागील दरवाजा तोडून आत शिरकाव करून चोरीचा प्रयत्न करीत एक चांदीची मुर्ती चोरुन नेली आहे. सोनल शिंदे यांनी याप्रकरणाची माहिती शहर पोलिसांना दिली.

शहर पोलिस ठाण्याचे (Police station) पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस पथक तसेच श्वान पथक, ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करुन पंचनामा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here