१८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनी मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याचे आवाहन

@maharashtracity

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने (ECI) मतदार याद्या सुधारित करण्यासाठी ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ ची ‘वॉकथॉन’ने सुरुवात केली 

असून प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. ज्या मतदारांची नावे या मतदार यादीत नसतील किंवा कोणाचे काही आक्षेप असतील तर त्यांनी ८ डिसेंबरपर्यंत त्याची नोंद निवडणूक विभागाकडे करावी. 

दिनांक २६ डिसेंबर २०२२ पर्यंत आक्षेप व दावे निकालात काढण्यात येणार आहेत. तसेच, १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या तरुणांनी आपली नावे मतदार यादीत (voters list) लवकरात लवकर नोंदवावी, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे, १२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि २६ व २७ नोव्हेंबर २०२२ रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

“मतदान हा आपल्याला मिळालेला घटनादत्त अधिकार असून या अधिकाराचा वापर आपण विचारपूर्वक व काळजीपूर्वक करायला हवा. मात्र, हा वापर करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. तसेच, १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आगाऊ नाव नोंदणी करून मतदार यादीत नाव नोंदविता येते. तथापि, मतदानाचा अधिकार मात्र १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतरच प्राप्त होतो, अशी माहिती जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली.  

आजपासून भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत असून यानिमित्ताने त्या अभियानाच्या निमित्ताने  महाविद्यालयीन युवक युवतींना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजीत साखरे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जगतसिंह गिरासे, तहसिलदार विरसिंग वसावे, तहसिलदार सचिन भालेराव, तहसिलदार मिलिंद मुंढे आणि मान्यवर उपस्थित होते.

बुधवारी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ अंतर्गत आयोजित वॉकथॉन या जनजागृती रॅलीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. 

पूर्वी मतदार यादीत नाव नोंदणी वर्षातून एकदा किंवा निवडणुकीच्या काही कालावधी आधी करता येत असे. मात्र, त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून आता वर्षातून चार वेळा मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आपले नाव असल्याची खातरजमा सर्व मतदारांनी आवर्जून करून घ्यावी. ही यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकानार्थ उपलब्ध असेल, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

यापूर्वी मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती.  मात्र, आता २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे युवकांना वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदानाचा अधिकार प्रत्यक्ष स्वरूपात प्राप्त होणार आहे, असे निधी चौधरी यांनी सांगितले. यासंदर्भात दावे व हरकती ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील तर ५ जानेवारी २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाणार आहे. 

१ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्ष वय पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष वय पूर्ण होणार आहे, ते पण नविन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करु शकणार आहेत, असे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या निवडणूक कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here