@maharashtracity

मुंबई: मुंबईतील रात्रशाळांना करण्यात आलेली भरमसाठ भाडेवाढ विलंब शुल्कासह माफ करावी अशी मागणी शिक्षक भारतीचे प्रमुख आणि आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महापालिका आयुक्त आय एस चहल (BMC Commissioner IS Chaha) यांना पत्र दिले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत रात्रशाळा (Night School), रात्र ज्युनिअर कॉलेज भरत असतात. या रात्रशाळांना वाढीव शुल्क आकारून भाडे पावत्या देण्यात आल्या आहेत. मुंबईतील रात्रशाळांना १५० वर्षांची परंपरा आहे. या रात्रशाळांमध्ये गरीब, मागासवर्गीय, कष्टकरी समाज घटकातील मुलं शिक्षण घेतात.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या कारकिर्दीत रात्रशाळांचे भाडे माफ करण्याबाबत निर्णय झाला होता. नाममात्र भाडे ५० रुपये ठरवण्यात आले आहे, अशी माहिती भारती हिंदी नाईट हायस्कुलचे मुख्याध्यापक माताचरण मिश्रा यांनी दिली.

मात्र आता सन २०१५-१६, २०१७-१८ आणि सन २०१८-१९ या काळासाठी प्रत्येक वर्गामागे ८७० रुपये व ९१० रुपये या प्रमाणे भाडेवाढ करून लाखो रुपये भरण्याबाबत नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

या रात्रशाळा गरीब संस्थांकडून सेवाभावी पद्धतीने चालवल्या जातात. त्यामुळे हे भाडं भरणं त्यांना शक्य नाही, महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here