@vivekbhavsar

मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागेसाठी होत असलेली निवडणूक (Rajya Sabha polls) चुरशीची होईल असे चिन्हे दिसत आहेत. सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना शिल्लक मते देण्याचे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे. तर महाराजांनी सेनेकडून निवडणूक लढवली तरच त्यांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका शिवसेनेने (Shiv Sena) घेतली आहे. यात भाजपच्या भूमिकेकडे काहीसे दुर्लक्ष झाले असले तरी भाजपने (BJP) या निवडणुकीत बॉम्ब टाकण्याची तयारी केलेली दिसत आहे. यासाठी भाजपने शिवसेना नेत्याला पक्ष प्रवेश देवून भाजपची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी कुजबूज आहे.

महाराष्ट्रातून (Maharashtra) रिक्त होणाऱ्या सहा पैकी भाजपचे पियूष गोयल (Piyush Goyal), विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahasrabuddhe) आणि विकास महात्मे (Vikas Mahatme) यांचा समावेश आहे. राज्यसभा निवडुकीसाठी ४२ मतांचा कोटा लागणार आहे. १०६ आणि ९ अपक्ष यांच्या मदतीने भाजपकडे ११५ मतांचा कोटा आहे. भाजपचे दोन उमेदवार सहज जिंकून येतील आणि काही मते शिल्लक राहतील.

या सहज निवडून येणाऱ्या २ जागेपैकी एका जागेसाठी केंद्रात मंत्री असलेल्या पियूष गोयल यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल. तर दुसऱ्या जागेसाठी सेनेच्या कोकणातील एका नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देवून उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे.

सेनेतून किमान तीन नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक असून तसे झाल्यास भाजपला कोकणात (Konkan) हात पाय पसरवायला आणि सेनेला अडचणीत आणण्याचे उद्योग करता येणार आहे. मराठा (Maratha) आणि कुणबी (Kunbi) नेत्यांना भाजपात प्रवेश दिल्यास सेनेवर नाराज असलेला हा समाज भाजपकडे वळेल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे.

शिवसेनेचे तीन टर्म अर्थात १८ वर्षे राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधीत्व करत असलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच पुन्हा उमेदवारी देणार असल्याचे समजते. राऊत अत्यंत आत्मविश्वासाने वावरत असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली.

सेनेला हवी राष्ट्रवादीकडून परतफेड

राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसची (Congress) शिल्लक राहणारी मते घेवून सेनेचा दुसरा उमेदवार निवडणूक आणायचा अशी सेना नेतृत्वाची खेळी आहे. २०२० मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने सहकार्याची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य करावे आणि सेनेचा दुसरा उमेदवार निवडून आणावा, अशी सेनेची अपेक्षा आहे.

काँग्रेसचे तळ्यात मळ्यात

काँग्रेसचे महाराष्ट्रातून निवृत्त होणारे सदस्य पी चिदंबरम (P Chidambaram) आहेत. चिदंबरम यांनी गेल्या सहा वर्षांत कधीही महाराष्ट्रात काम केले नाही, पक्षाला वेळ दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचा चिदंबरम यांना विरोध आहे. चिदंबरम यांना यावेळी तामिळनाडू (Tamil Nadu) येथून तिकीट दिले जाईल अशी एक शक्यता असली तरी पक्ष श्रेष्ठी त्यांना आता राज्यसभेवर न पाठवता संघटनेची जबाबदारी सोपवतील, अशी दुसरी शक्यता वर्तवली जात आहे.

मागच्या काही दिवसापूर्वी पुण्यात (Pune) आलेल्या चिदंबरम यांनी वकिली व्यवसायाला त्यांचे प्राधान्य आहे आणि त्यांची वकिली उत्तम चालते असे उद्गार बार कौन्सिलच्या सभेत काढले होते. बिट्विन द लाईन विचार केला तर तुम्ही मला तिकीट दिले नाही तर माझे पोट भरण्याचे अन्य व्यवसाय आहे, असेच त्यांना सुचवायचे असावे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल पटेल (Praful Patel) यांनाच पुन्हा उमेदवारी देईल, यात काही शंका नाही. खरी उत्सुकता भाजपच्या दुसऱ्या उमेवाराबाबत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिफारस केलेले नारायण राणे (Narayan Rane), कपिल पाटील (Kapil Patil) आणि भरती पवार (Bharati Pawar) या तिघांचा सामावेश केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) केला गेला. तसेच आता फडणवीस यांनी कोकणातील कुणबी आणि मराठा समाजाचे गणित समजावून सांगितले तर एकाच वेळी सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांची शिकार करणे भाजपला शक्य होणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भाजपच्या एका गटाकडून विनोद तावडे (Vinod Tawde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचेही नाव चालवले जात आहे. या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली तर ते फडणवीस यांच्यासाठी केंद्रीय नेतृत्वाचे धक्कातंत्र असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here