डॉ मिर्झा किती पदांचा राजीनामा देणार?

@vivekbhavsar

उदयपूर येथील काँग्रेसच्या चिंतन शिबिराला (Chintan Shibir of Congress) माजी मंत्री नसीम खान यांनी फारच मनावर घेतले आहे. एक व्यक्ती एक पद या ठरावाला अनुसरून नसीम खान यांनी आज काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्ष या दुय्यम पदाचा राजीनामा दिला. मात्र, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मुस्लिम समाजात एकमेव नेते असल्याचा दावा करणारे डॉ वजाहात मिर्झा (Dr Wajahat Mirza) यांच्याकडे चार पदे असल्याने ते अन्य तीन पदे सोडतील का असा प्रश्न काँग्रेमधूनच (Congress) उपस्थित केला जात आहे.

‘एक व्यक्ती एक पद’ ही भारतीय जनता पक्षाची (BJP) पद्धत काँग्रेसने उदयपूर (Udaypur) शिबिरात कागदोपत्री ठराव करून स्वीकारली असली तरी त्याची कितपत अमलबजावणी होते हे राज्य सभेसाठी कोणाला तिकीट दिले जाते, यातून लगेचच स्पष्ट होणार आहे. पराभूत झालेल्या उमेदवाराला राज्यसभा (Rajya Sabha) किंवा विधान परिषदेची (Vidhan Parishad) उमेदवारी देऊ नये, असाही ठराव काँग्रेसने केला होता. मात्र, या आधीचे उदाहरणे बघितली तर या निर्णयावर फारशी अमलबजावणी झालेली दिसत नाही.

दरम्यान, उदयपूर येथील याच नव्या निर्णयाला अनुसरून माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी त्यांच्याकडे असलेले प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रचार समितीचे अध्यक्षपद सोडले आहे.

आता चर्चा सुरू झालीय ती डॉ वजाहात मिर्झा यांच्या नावाची. महाराष्ट्र काँग्रेससाठी राज्यात हे एकमेव मुस्लिम (Muslim leader) समाजाचे लोकमान्य नेते आहेत, असे समजले जाते. याच डॉ मिर्झा यांच्या गळ्यात विधान परिषद सदस्य पदाची माळ घालण्यात आली. ती कमी की काय म्हणून वक्फ बोर्डाचे (Waqf board) चेअरमन बनवण्यात आले. ते ही कमी पडले असावे म्हणून अल्पसंख्यांक आयोगाचे (Minority commission) अध्यक्षपद बहाल करण्यात आले. यवतमाळ (Yavatmal) जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद तर आहेच आहे.

राज्यात असंख्य मुस्लिम नेते आहेत जे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांना एक पद मिळणे कठीण असताना डॉ मिर्झा यांच्या गळ्यात चार चार पदे कसे देण्यात येतात? असा प्रश्न मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here