Twitter: @maharashtracity

मुंबई: उपनगरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी (MP Gopal Shetty) यांनी खासदार चषकानिमित्त कबड्डीपटूंना प्रति सामना मानधन देण्याचे जाहीर केले आहे. पोयसर जिमखान्याच्या सहकार्याने होत असलेली ही स्पर्धा एकंदर प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी पुरूष गट आणि महिला गट या तीन गटात खेळवली जाणार आहे. येत्या 5 ते 8 जानेवारीदरम्यान बोरीवलीच्या पश्चिमेला असलेल्या प्रमोद महाजन क्रीडांगणात कबड्डीचा थरार अनुभवयाला मिळेल.

कबड्डीतील खेळाडूंनाही प्रो कबड्डीप्रमाणे (Pro Kabaddi) प्रत्येक सामन्याला मानधन मिळायला हवे आणि तो त्यांचा अधिकार असल्याचे सांगून खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांघिक आणि रोख पुरस्कारांसह सामन्यात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 500 रुपये मानधन देणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच कबड्डीपटूंनी आणि संघटकांनी जोरदार स्वागत केले. हा निर्णय आता प्रत्येक आयोजकांनी घ्यायला हवा, असेही आवाहन आजी-माजी कबड्डीपटूंनी केले आहे.

या मानधनासह प्रथम श्रेणी गटात विजेत्यांना 20 हजार रुपये तर उपविजेत्यांना 15 हजारांचे इनाम आणि झळाळता करंडक दिला जाईल. द्वितीय श्रेणी गटात विजेता 15 हजारांचा तर उपविजेता 10 हजारांचा मानकरी ठरेल. महिला गटातही याच पद्धतीने रोख पुरस्कार दिले जातील, अशी माहिती खासदार शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेच्या प्रथम श्रेणीत सह्याद्री क्रीडा मंडळ (गोरेगाव), श्री सिद्धी, नवमहाराष्ट्र मंडळ, ओम साई क्रीडा मंडळ, अभिनव क्रीडा मंडळ, नवजीवन क्रीडा मंडळ, प्रशांत, गोकुळवन आणि संघर्ष असे तगडे संघ खेळतील. ब गटातही 12 नामांकित संघ खेळणार आहे. महिलांच्या गटात जगदंबा, स्वांतत्र्य, नवमहाराष्ट्र, वंदे मातरम, ओम साई, सह्याद्री, युनिव्हर्सल आणि ओम नवमहाराष्ट्र असे संघ आपला खेळ दाखवतील. 

या दिमाखदार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवछत्रपती पुरस्कार विजेते जया शेट्टी आणि छाया शेट्टी या दांम्पत्याच्या हस्ते केला जाईल. याप्रसंगी आयोजक खासदार गोपाळ शेट्टी, पोयसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी यांची उपस्थिती लाभेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here