ज्युनियर गटात पाचव्या क्रमांकावर झेप

Twitter: @maharashtracity

मुंबई: फिलिपिन्स येथील मनिलामध्ये झालेल्या १९व्या आशियाई ज्युनियर तालबद्ध (ऱ्हिदमिक) जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताच्या परिणा राहुल मदनपोत्रा हिने आपल्या कलेचा उत्तम नजराणा सादर करत भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. जपान, कोरिया यांसारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांवर सरशी साधत परिणाने सातासमुद्रापार भारताचा डंका वाजवला. 

दिनांक ३१ मे ते ३ जून या कालावधीत रंगलेल्या या स्पर्धेत परिणा हिने ज्युनियर गटात अप्रतिम कामगिरी करत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. मलेशिया, कोरिया, जपान यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान असतानाही परिणाने २४.१५ गुणांची कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे, अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी परिणा ही भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली आहे. 

या स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी परिणाने नोंदवल्यामुळे मुख्य प्रशिक्षक वर्षा उपाध्ये, प्रशिक्षक क्षिप्रा जोशी आणि सदिच्छा कुलकर्णी यांनी तिचे कौतुक केले आहे. 

लिलावती पोदार हायस्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या परिणाने २०१४ पासून जिम्नॅस्टिक्स खेळाकडे आपला मोर्चा वळवला. शिक्षण आणि खेळ यांची योग्य सांगड घालत परिणाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही अफलातून कामगिरी करत अनेक पदके आपल्या नावावर केली आहेत. गेल्या वर्षी थायलंड येथे झालेल्या १८व्या आशियाई ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परिणाने चांगली कामगिरी साकारली होती, मात्र अंतिम फेरीत पोहोचण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये हाँगकाँग येथे झालेल्या हाँगकाँग इंटरनॅशनल ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परिणा मदनपोत्रा हिने दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले होते. 

राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही परिणाने आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या वर्षी ठाणे इथे झालेल्या सीआयसीएसई- राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत परिणाने पाच सुवर्ण पदकांची लयलूट करत दोन रौप्यपदकांवर मोहोर उमटवली होती. त्याआधी २०१९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन कांस्यपदके आपल्या नावावर केली होती. २०१९ च्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत परिणा हिने पाच सुवर्णपदके प्राप्त केली होती. त्यासोबत विविध कार्यक्रमांमध्येही तिने तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या खेळाचे सादरीकरण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here