मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज शपथविधी संपन्न झाला. ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्या पक्षाच्या एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे यांचे संघटन कौशल्य वादातीत आहे आणि त्यांनी ते दाखवून दिले आहे. आक्रमक शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती. पण विधान परिषदेचे सदस्य असलेले 78 वर्षीय सुभाष देसाई यांचे नाव पुकारताच काही लोकांच्या भुवया उंचावल्या असाव्यात. 


देसाई यांना उद्धव यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात का घेतले असावे, याबाबतची संभाव्य कारणे खालीलप्रणाणे असावीत.
– उद्धव ठाकरे यांना मंत्रिमंडळात त्यांचा खास विश्वासू व्यक्ती हवा आहे आणि देसाई ही त्यांची योग्य निवड आहे.


– अत्यंत सौम्य स्वभाव असलेले, खरे तर ‘माणूसघाने’ आणि शेजारून कार्यकर्ता गेला तरी त्याच्याशी न बोलणारे असा शिक्का बसलेले देसाई हेच उद्धव यांना सरकार चालवण्यात मदत करू शकतील.


– कारभार कसा चालवावा, कोणत्या नस्तीवर काय शेरा मारावा हे केवळ देसाईंच उद्धव यांना सांगू शकतील.


– फडणवीस सरकार मध्ये उद्योग मंत्री म्हणून काम करतांना देसाई यांचे केवळ महाराष्ट्र आणि देशातील उद्योगपतींशीच घनिष्ठ मैत्री झालेली नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी संबंश प्रस्थापित केले आहेत. 


– देसाई यांच्या या संबंधाचा फायदा महाराष्ट्र आणि ठाकरे हे उद्योग विरोधी नाहीत, ही प्रतिमा खोडून काढण्यास मदतच होणार आहे. नाणार आणि अन्य प्रकल्पांना विरोध केल्याने तयार झालेली नकारात्मक प्रतिमा पुसून काढणे ही या उद्धव सरकारची गरज असेेेल. 


– देसाई यांच्याकडे संघटना वाढीसाठी कार्यक्रम आहेत. पक्षाच्या वर्धापन दिनी त्यांनी शाखा आणि व्यक्ती पातळीवर पक्ष आणि पक्षाचे धोरण कसे पोहचवता येतील याबाबत उत्तम मार्गदर्शन केले होते.


– या अर्थाने देसाई हे पक्ष आणि सरकार यामधील दुवा म्हणून जबाबदारी पेलू शकतील.


– व्यक्ती आणि नेता म्हणून देसाई यांची प्रतिमा स्वच्छ आणि वादग्रस्त नसलेले अशीच आहे. (मागच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांच्यावर आरोप झाले हा एक अपवाद असावा).


– देसाई जेव्हा बोटातील अंगठी दुसऱ्या हाताने फिरवत असतात, तेव्हा समजावे, त्यांच्या मेंदूत काहीतरी चांगले शिजते आहे, कुठल्या तरी समस्येवर ते उत्तर शोधत आहेत. अशीच अंगठी फिरवून ते उद्धव यांच्यासमोर येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढतील, असे म्हणता येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here