मुंबई: सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया (Loya) यांच्या कथित संशयास्पद मृत्यूबद्दल कोणीही ठोस पुराव्यानिशी तक्रार दाखल केली तर या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करू, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या मंत्र्याची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 


लोहा गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करत होते. आपल्या एका सहकारी न्यायमूर्तीच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला (Nagpur)  गेले असताना 1 डिसेंबर 2014 रोजी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. 


महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन तास चाललेल्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर बुधवारी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले, या प्रकरणातील तक्रारीत काही तथ्य आढळल्यास सरकार पुन्हा या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देईल. 


गेल्या वर्षी महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी होईल का? असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारले होते.लोकांच्या मागणीनुसार, न्यायाधीश लोया यांच्या खटल्याची चौकशी शक्य असल्याचे पवारांनी स्पष्ट केले होते असे मलिक यांनी सांगितले. राज्याचे गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे संकेत दिले होते, असे ते म्हणाले.


न्यायाधीश लोया यांचा मृत्यू 1 डिसेंबर 2014 रोजी ‘नैसर्गिक कारणांमुळे’ झाला होता, असा निर्णय देत त्यांच्या मृत्यूची एसआयटी (SIT) चौकशी आणि याचिका सर्वोच्च न्यायालयाने (SC) फेटाळून लावल्या होत्या. 


सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आरोपी होते. लोया यांच्या मृत्यूनंतर सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयाने शाह यांना दोषमुक्त केले. त्यामुळेच, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूनंतर हा मृत्यू “संशयास्पद” असल्याच्या चर्चा झाल्या. सोहराबुद्दीन प्रकरणात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर देखील आरोप होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here