पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्राच्या अधिसूचनेत रायगड जिल्ह्यातील क्षेत्र बाधित

0
62

X : @MilindMane70

मुंबई – केंद्र सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (Eco-Sensitive Zone) म्हणून जाहीर केलेल्या यादीमध्ये रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या सात तालुक्यातील ३५६ गावातील १९२७ हेक्टर बाधित क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्प, उद्योग, दगडखणी व जंगलतोड, यासहित फार्म हाऊस संकल्पनेला बंदी येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केरळमधील वायनाड (Kerala landslide) जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे ३०० च्यावर नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण मातीच्या ढिगार्‍याखाली बेपत्ता झाले. या घटना डोंगर व टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर बेसुमार जंगलतोड व उत्खनन झाल्यामुळे घडत असल्याने केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. डॉ कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्र राज्यातील बारा जिल्ह्यातील ५६ तालुके व २१५९ गावातील १७३३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर लागू होऊ शकते. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या सात तालुक्यातील ३५६ गावातील १९२७ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे.

पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्राबाबत राज्य शासनाकडून २०१४ मध्ये अभिप्राय मागवण्यात आले होते. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, पोलादपूर, रोहा व सुधागड या तालुक्यांचा समावेश होता. डॉ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या अहवालात राज्यातील सुमारे १७३४० चौरस किलोमीटर क्षेत्र परिसंवेदनशील (Eco-Sensitive Zone) क्षेत्रात मोडत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार राज्यातील अहमदनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातील ५६ तालुक्यातील २२०० गावांचा समावेश करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र किती व समाविष्ट क्षेत्र किती व गावांची संख्या पुढीलप्रमाणे; कर्जत तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६३४ चौरस किलोमीटर आहे तर परिसंवेदनशील क्षेत्र २६६ चौरस किलोमीटर येत असून गावांची संख्या ४५ आहे. खालापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३९५ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र १३३ चौरस किलोमीटर आहे तर यामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांची संख्या २२ आहे.

महाड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ७९६ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र ४०९ चौरस किलोमीटर असून गावांची संख्या ६८ आहे. माणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६७५ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र २३८ चौरस किलोमीटर असून यामध्ये ४७ गावांचा समावेश आहे. पोलादपूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३५४ चौरस किलोमीटर असून यामध्ये परिसंवेदनशील क्षेत्र १७९ चौरस किलोमीटर असून गावांची संख्या ३६ आहे.

रोहा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६०३ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र ३८३ चौरस किलोमीटर असून गावांची संख्या ८६ आहे. सुधागड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ४४४ चौरस किलोमीटर तर परिसंवेदनशील क्षेत्र ३१९ चौरस किलोमीटर असून गावांची संख्या ५२ आहे. एकंदरीत रायगड जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ३९०१ चौरस किलोमीटर सात तालुक्याचे असून त्यामध्ये परिसंवेदनशील क्षेत्र १९२७ चौरस किलोमीटर आहे. तर या सात तालुक्यातील समाविष्ट गावांची संख्या ३५६ आहे.

गावातील प्रत्यक्ष नैसर्गिक भू क्षेत्र यामध्ये वनक्षेत्र, नदी, सरोवर, शासकीय पडीक जमीन किंवा गायरान क्षेत्र, देवस्थान जमीन इत्यादींचा समावेश या परिसंवेदनशील क्षेत्रामध्ये असून गावठाण क्षेत्र, कृषी क्षेत्र (लागवडीखाली असणारी जमीन) अकृषी क्षेत्र (पडीक व माळरान क्षेत्र) मानवनिर्मित भुवापर क्षेत्र (गावातील रहिवासी किती जमिनीचा वापर करतात याची इत्यंभूत माहिती) शासनाने यापूर्वी संकलित केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here