समाजात गैरसमज वाढेल कसा हेच मिशन!

Twitter : @maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे असंच मिशन राज्यपालांचे आहे का? अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला खा शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर आपली सडेतोड मते व्यक्त केली.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेला उल्लेख या सगळ्या गोष्टी असे सांगतात की या पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते, त्याचे यत्किचिंतही स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रात पाठवलेली आहे, अशी टीका पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर केली.

राज्यपाल ही एक संस्था आहे. त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवायची असते म्हणून त्यावर आतापर्यंत कोण बोलले नाही. मात्र, आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले उल्लेख पाहिल्यानंतर राज्यपालांनी आता मर्यादा ओलांडल्या आहेत असेच म्हणावे लागेल, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्यावर राज्यपाल यांनी शिवाजी महाराज यांचे कौतुक करणारे स्टेटमेंट आले आहे. पण हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्यामुळे राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी त्यांच्याबाबत निर्णय घेतला पाहिजे आणि अशाप्रकारच्या व्यक्तीकडे जबाबदारी देणे योग्य नाही, असे स्पष्ट मतही पवार यांनी मांडले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहे. परंतु, आम्ही बरीच वर्षे बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर गावे मागत आहोत. त्यामध्ये आमचे सातत्य आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत. परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल यावर चर्चा होऊ शकते. मात्र, काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही, अशा परखड शब्दात पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले.

मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे त्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. कारण अशा गोष्टीवर माझा विश्वास नाही. त्यामुळे मी जागा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही असा उपरोधिक टोला पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी घेतलेल्या ज्योतिषाच्या भेटीबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लगावला.

हल्ली महाराष्ट्रात नवीन काही सुरू झाले आहे जे कधी महाराष्ट्रात नव्हते. आसाममध्ये (Assam) काय घडले हे सगळे देशाला माहित आहे. आता पुन्हा आसामची टूर होणार आहे. तसे वर्तमानपत्रात वाचले. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणे आणि आणखी कुठे सिन्नरला जाणे व कुणाला तरी हात दाखवणे या सगळ्या गोष्टी आम्हा लोकांना नवीन आहेत. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. विज्ञानाचा पुरस्कार करणारे राज्य हा राज्याचा लौकिक आहे. त्या राज्यात या सगळ्या गोष्टी नवीन पहायला मिळत आहे. मात्र, नवीन पिढी या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत नाही, हे दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्रीही पवार यांनी व्यक्त केली.

गुजरातमध्ये विधानसभेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Gujarat election) महाराष्ट्राने काही जिल्ह्यांत घोषित केलेल्या सुट्ट्यांबाबत विचारले असता पवार यांनी स्पष्ट केले की शेजारील राज्यात निवडणूका म्हणून आपल्या राज्यात सुट्टया देण्याचा प्रघात यापूर्वी ५०-५५ वर्षात ऐकला नाही. मात्र गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय अशी शंका येणारी स्थिती असल्याचे पवार यांनी नमूद केले.

पवार म्हणाले, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निवडणुक आयोगासंदर्भात जी प्रतिक्रिया दिली आहे ती अतिशय स्वच्छ भूमिका आहे हे सांगते. या सगळ्या नियुक्त्यांमध्ये कोर्टालाही सांगण्याची वेळ आली आहे. कोर्टाने ही – ही माहिती तुम्ही सादर करा असे स्पष्ट सांगितले आहे, याची चिंता का वाटते असा सवाल करतानाच, आतापर्यंत सुप्रीम कोर्ट स्वच्छ व स्पष्टपणे बोलत नव्हते, आज ते बोलायला लागले आहे, असे दिसते. एकंदरीतच सत्तेचा दुरुपयोग कशा पद्धतीने केला जात आहे, हे त्यांच्याही लक्षात आले आहे असेही पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.

राज्यात आज शेतकरी अस्वस्थ झाला आहे. इतक्या संकटात पहिल्यांदाच सापडला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, तशी ठोस पावले उचलताना सरकार दिसत नाही. या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने बघायची गरज असताना सरकार बघत नाही, ही दु:खद बाब असल्याचेही पवार यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here