मुंबई मनपात शिवसेना – काँग्रेसमध्ये श्रेयवाद

मुंबई: कोरोनाने अगोदरच त्रासलेल्या मुंबईकरांवर १४% – २५% मालमत्ता करवाढ लादण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकित आला असता प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी फेटाळून लावला आहे.

मात्र मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव आम्ही केलेल्या विरोधामुळेच फेटाळला गेला आहे, असा दावा शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस (Congress) नेत्यांनी केल्याने पालिकेत मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसून आले.

मुंबईकर अगोदरच कोरोनामुळे हैराण झाले आहेत. त्यांच्या नोकऱ्या, रोजगार गेल्याने ते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मालमत्ता करवाढ लादणे योग्य नाही, अशी प्रखर भूमिका घेऊन काँग्रेसने अगोदरच त्यास कडाडून विरोध केला होता.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवले होते. त्यामुळे मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव काँग्रेसने विरोध केल्यामुळेच फेटाळून लावण्यात आला आहे, असा दावा पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

तर, मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाला शिवसेनेने अगोदरच विरोध केला होता. त्यानुसार आजच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी, उपसूचना मांडून सदर प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली होती व त्यामुळेच हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

मुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करात काही प्रमाणात वाढ केली जाते. सन २०१५ मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्येही मालमत्ता करवाढ केली जाणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे करवाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

कोरोनाच्या उपाययोजनांवर पालिकेने दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी खर्च केला आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. पालिकेने त्याच्या भरपाईसाठी मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला होता.

मात्र सभागृहनेत्या विशाखा राऊत (Vishakha Raut) यांनी उपसूचना मांडून प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली असता त्यास सर्वपक्षीय गटनेते पाठिंबा दिल्याने प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here